केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयालाही ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने निवेदन
जनुकीय परिवर्तन करून सुधारणा (Genetically Modified) केलेले अन्नपदार्थ हे जीवजंतूंपासून मिळवलेले पदार्थ आहेत, ज्यांचे परिवर्तन नैसर्गिकरित्या केले जात नाही. जनुकीय परिवर्तनांमुळे कॅन्सर, कुपोषण, रोगप्रतिकारक शक्तीची न्यूनता इत्यादी गंभीर आजार उद्भवू शकतात. या प्रकारच्या अन्नपदार्थात अधिक प्रमाणात खते, सिंचन आणि विषारी कीटकनाशकांच्या वापर केल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे पर्यावरणाच्या संतुलनावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जनुकीय परिवर्तित अन्नपदार्थांच्या ऐवजी सेंद्रिय अन्नपदार्थांना (Organic Food) प्राधान्य द्यावे, अशी मागणी आरोग्य साहाय्य समितीने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जनुकीय परिवर्तित अन्नपदार्थांसह (GM Food) अन्य अन्नपदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री आणि आयात या संदर्भात समाजातून प्रतिक्रिया, अभिप्राय मागवले होते. त्यानुसार आरोग्य साहाय्य समितीने आपले निवेदन सादर केले.
या संदर्भात आरोग्य साहाय्य समितीने पुढील मागण्या केल्या आहेत –
1. जनुकीय परिवर्तित अन्नपदार्थांमुळे कॅन्सर, कुपोषण, अँटीबॉडीजची कमतरता, इम्युनो-सप्रेशन इत्यादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. तसेच विषारी द्रव्यांचे उत्पादन हानिकारक पातळीवर वाढवू शकते.
2. जनुकीय परिवर्तन केलेल्या पिकांमध्ये पोषण मूल्यांशी तडजोड केली जाते. त्यामुळे सेंद्रीय पिकांवर भर देणे आवश्यक आहे.
3. जनुकीय परिवर्तन केलेल्या पिकांच्या 3 लागवडीनंतर जमिनीची सुपीकता आणि अन्नाचा स्तर खराब होतो. त्यामुळे शेतकर्यांवर आर्थिक भार वाढतो.
4. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जनुकीय परिवर्तित बियाणांच्या ऐवजी नैसर्गिक/सेंद्रिय बियाणांचा विचार करायला हवा. सेंद्रिय बियाणे आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी तसेच पर्यावरण समतोलासाठी अधिक चांगले आहेत.
5. जनुकीय परिवर्तित अन्नपदार्थांच्या उत्पादनामुळे किंवा त्याच्या वाढीमुळे विकसनशील देश औद्योगिक देशांवर अधिक प्रमाणात अवलंबून राहण्याचा धोका वाढू शकतो; कारण आगामी काळात त्यांच्याद्वारे अन्न उत्पादन नियंत्रित केले जाऊ शकते.