दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची माहिती
काश्मिरी हिंदूंचे धक्कादायक वास्तव उघड करणार्या चित्रपटाची प्रसिद्धी कुणीही करणार नाही, हे लक्षात घेऊन राष्ट्रप्रेमी भारतियांनीच यासाठी पुढाकार घ्यावा !
मुंबई – विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यास ‘द कपिल शर्मा शो’ या ‘रिअॅलिटी शो’चे (प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात येणारा कार्यक्रम) कपिल शर्मा यांनी नकार दिला आहे, अशी माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरद्वारे दिली. या चित्रपटात मोठे व्यावसायिक कलाकार नसल्याने शर्मा यांनी प्रसिद्धी देण्यास नकार दिल्याचे अग्निहोत्री यांचे म्हणणे आहे. एका व्यक्तीने अग्निहोत्री यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये चित्रपटाचे विज्ञापन करून प्रसिद्धी मिळवण्याविषयी सुचवले होते. त्यावर उत्तर देतांना त्यांनी वरील विधान केले.
अग्निहोत्री पुढे म्हणाले, ‘‘हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्धीवलय नसलेले दिग्दर्शक, लेखक आणि चांगले कलाकार यांना सध्या कुणीही विचारत नाही. शर्मा यांनी त्यांच्या कार्यक्रमात कुणाला बोलवावे ?, हा निर्णय संपूर्णतः ते आणि निर्माते यांचाच आहे. एकदा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन म. गांधी यांच्याविषयी म्हणाले होते की, वो राजा है, हम रंक.’’
I don’t get to decide who should be invited on @KapilSharmaK9 show. It’s his and his producers choice whom he wants to invite. As far as Bollywood is concerned, I’d say what once Mr. Bachchan was quoted saying about Gandhis: वो राजा हैं हम रंक… https://t.co/la8y9FhB6l
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 7, 2022
अग्निहोत्री यांच्या ट्वीटनंतर अनेकांनी कपिल शर्मा यांना विरोध करून त्यांच्यावर टीका केली. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरी हिंदूंवर आधारित आहे. वर्ष १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदूंवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या करण्यात आलेल्या हत्या, यांवर हा चित्रपट आधारित आहे. ११ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.