|
पुणे – महिलांनी स्वतः धर्माचरण करावे आणि पुढच्या पिढीवरही धर्माचे संस्कार करावेत, स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन शारीरिक बळ वाढवावे, साधना करून आध्यात्मिक बळ मिळवून राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थित महिलांना केले. त्या येथील ‘सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवती मंडळ स्वारगेट, पुणे’ या संघटनेच्या वतीने ६ मार्च या दिवशी जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी त्यांनी ‘महिलांची सद्यःस्थिती, लव्ह जिहादचे संकट, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपाय’ या संदर्भात मार्गदर्शन केले.
क्षत्रिय समाजाचे श्री. विनायक रोडगे हे मागील काही वर्षांपासून समितीच्या कार्याशी जोडलेले आहेत. त्यांना महिलादिनाच्या कार्यक्रमाची माहिती मिळाल्यावर त्यांनी उपस्थित महिलांपर्यंत हा विषय पोचावा आणि त्या जागृत व्हाव्यात, यासाठी तळमळीने प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी असलेल्या ‘सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवती मंडळा’च्या सौ. शीतल काटवे, श्री. मनोज काटवे आणि श्री. विनेश झाड यांनी हा विषय महिलांपर्यंत पोचावा, यासाठी विशेष सहकार्य केले. या वेळी ७० हून अधिक महिला उपस्थित होत्या. व्याख्यानानंतर सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
विशेष
१. कार्यक्रमाची छायाचित्रे काढण्यासाठी उपस्थित असलेले श्री. किरण बुरबुरे यांनी व्याख्यानानंतर ‘मला सनातन संस्थेचे हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘लव्ह जिहाद’चे ग्रंथ सर्वांना देण्यासाठी हवे आहेत’, असे स्वतः येऊन सांगितले.
२. श्री. बाळासाहेब झाड म्हणाले, ‘‘विषय पुष्कळ महत्त्वाचा होता. तो सर्वांना पुनःपुन्हा सांगणे आवश्यक आहे. आमचे मंगल कार्यालय, मोठे सभागृह आणि वसतीगृह धर्मसेवेसाठी वापरा.’’