अफगाणिस्तानमध्ये लोक उपाशी आहेत, तेथे तालिबान्यांच्या राजवटीत लोकांचे हाल होत आहेत. तेथील लोकांना कोण शिक्षा करत आहे, हेही इस्लामिक स्टेटने सांगावे !
कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे इस्लामिक स्टेटने कौतुक केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध म्हणजे पाश्चात्त्य देशांना अल्लाने दिलेली शिक्षा आहे, असे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे. असे असले, तरी रशिया कि युक्रेन यांपैकी एकाची निवड करण्यात इस्लामिक स्टेटने नकार दिला आहे.
भविष्यात यापेक्षाही मोठी युद्धे होतील. अशा प्रकारची युद्धे होणे, ही पश्चात्त्य देशांसाठी चपराक असेल. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध हा मोठ्या युद्धाचा झालेला आरंभ आहे अन् या युद्धाचे परिणाम भयावह असतील, असे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की हे ज्यू आहेत. इस्लामिक स्टेटला हरवण्यासाठी ज्या अनेक देशांचे वैश्विक संघटन झाले होते, त्यात युक्रेनही सहभागी झाला होता. त्यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सीरियात इस्लामिक स्टेट आतंकवादी कारवाया करत असतांना तेथील राष्ट्रपती बशर अल्-असद यांना सहकार्य केले होते. या दोन्ही राष्ट्रांनी इस्लामिक स्टेटच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे या आतंकवादी संघटनेने कुणा एका देशाची बाजू घेण्यास नकार दिला आहे.