Menu Close

मारियुपोल (युक्रेन) येथे अन्न-पाण्यासाठी नागरिकांकडून एकमेकांवर होत आहेत आक्रमणे !

मारियुपोल (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाला १६ दिवस झाले आहेत. रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या अनेक शहरांत प्रवेश करून तेथे नियंत्रण मिळवले आहे. काही शहरांना वेढा घातला आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही रशियाच्या सैन्याने लक्ष्य करणे चालू केले आहे. मारियुपोलमधल्या एका रुग्णालयावर केलेल्या आक्रमणात ६ वर्षांच्या मुलीसह ३ जण ठार झाले आहेत. या शहराला वेढा घालण्यात आल्याने अन्न, पाणी आणि वीज यांच्याविना नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत. या भागात कडाक्याची थंडी असून अशा थंडीमध्ये अन्न-पाण्याखेरीज दिवस काढणे युक्रेनी नागरिकांसाठी अवघड बनले आहे. यामुळे नागरिकांनी अन्न-पाण्यासाठी एकमेकांवर आक्रमण करण्यास चालू केले आहे.

१. मारियुपोलमध्ये रेडक्रॉस संस्था साहाय्य पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले की, मारियुपोलमधली स्थिती अत्यंत भयावह झाली असून तेथील नागरिक अन्न-पाण्यासाठी एकमेकांवर आक्रमण करू लागले आहेत. पाणी नसल्यामुळे लोकांनी बर्फ वितळवून त्याचे पाणी प्यायला चालू केले आहे. अन्न अल्प असल्याने लहान मुलांना खायला दिले जात नाही. मारियुपोलच्या रस्त्यावर लोकांचे किमान १ सहस्र २०० मृतदेह पडलेले आहेत. या सगळ्यांचा रशियाच्या आक्रमणात मृत्यू झाला आहे.

२. साशा वोलकोव या मारियुपोलमधल्या रेड क्रॉसच्या दलप्रमुख असून त्यांनी सांगितले, ‘या शहरात भाज्यांचा काळाबाजार चालू झाला आहे. इतर खाद्यपदार्थ मात्र कुठेही मिळत नाहीत. मारियुपोलमध्ये ५ दिवसांपूर्वी औषधांचा साठा लुटण्यात आला होता. लोक भूमिगत निवार्‍यांमध्ये आसरा घेत असून उणे ९ सेल्सियस तापमानात शरिरात ऊब रहावी, यासाठी लोक एकमेकांना मिठी मारून दिवस काढत आहेत.

३. साशा वोलकोव यांनी सांगितले, ‘लोक मधुमेह आणि कर्करोग यांवरील औषधे शोधण्यासाठी वणवण करत आहेत; मात्र त्यांना ती कुठेही मिळत नाहीत. मृत्यूमुखी पडलेल्यांना कार्पेटमध्ये किंवा प्लॅस्टिक बॅगेत गुंडाळून ८० फूट लांब खड्ड्यात ढकलून दिले जात आहे.’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *