मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुलुंड येथे घेण्यात येत असलेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या प्रथम दिवशी संत आणि मान्यवर यांच्या शुभहस्ते सनातनच्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेजीके वर्ष १९९२ में आयोजित अभ्यासवर्ग’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. १२ मार्च या दिवशी अधिवेशनाच्या उद्घाटनसत्रात राष्ट्रीय वारकरी परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रदीप महाराज पाटील, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर, वसई (मेधे) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला आणि महाराष्ट्र प्रदेश वारकरी संप्रदायाच्या तीर्थक्षेत्र समितीचे कार्यकारी प्रमुख ह.भ.प. सुभाष गोविंदबुवा बन यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले.
मुलुंड येथे १२ आणि १३ मार्च या दिवशी हे अधिवेशन झाले. डॉक्टर, अधिवक्ता, उद्योजक, पत्रकार, लोकप्रतिनिधी आदी विविध क्षेत्रांतील आणि विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. या अधिवेशनात हिंदूसंघटन, हिंदु धर्मावरील विविध आघात, अध्यात्म आदी विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. हिंदुत्वाचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साधनेचे महत्त्व उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी समजून घेतले. काही उपस्थितांनी साधनेविषयी आलेले अनुभव सांगितले. काही हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशनातील सेवाही केली. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ या अधिवेशनात सहभागी झाले होते.