ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्यान
नाशिक – आजच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून स्वतःतील शौर्य जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कु. नारायणी शहाणे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ मार्च या दिवशी ‘ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आपल्यामध्ये शौर्य आधीपासूनच आहे; पण ते सुप्तावस्थेत आहे. आता त्याला जागृत करूया. आता क्रांतिकारकांचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांसाठी वेळ देऊया. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी चापेकर बंधूंकडून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याची शपथ घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकचे भूमीपुत्र आहेत. सर्व क्रांतिकारकांचे शिरोमणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श घेऊन शौर्य जागृत होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होऊया, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या वेळी मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. त्यांनी ‘हर हर महादेव’ च्या घोषणांचा गजर करून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्याख्यानाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल शिंदे यांनी सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. भावना काळुंगे यांनी केले.
अभिप्राय !
१. योगेश नागरकर, धर्मप्रेमी – आपण सर्व हिंदु बांधवांनी एकत्रित येऊन चर्चा कृती केली पाहिजे.
२. श्रीकांत जाधव, धर्मप्रेमी – आजच्या काळात धर्मशिक्षण घेणे आणि प्रशिक्षणाची आवश्यकता किती आवश्यक आहे, हे लक्षात आले.