Menu Close

माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण शक्य ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने महिलादिनानिमित्त ‘जागर स्त्रीशक्तीचा !’ याविषयी ‘ऑनलाईन’ व्याख्यान पार पडले !

पुणे – देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांमागे विविध कारणे आहेत. सध्या चित्रपटांच्या माध्यमांतून वाढलेली वासनांधता, अश्लीलता यांमुळे देशातील युवती आपल्याला लाभलेला राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ यांचा ऐतिहासिक वारसा विसरल्या आणि चित्रपटांतील अभिनेत्रींना आदर्श मानून त्यांचे अनुकरण करू लागल्या. चित्रपटांच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले गेले. त्याचेच अनुकरण झाल्याने आज सहस्रो हिंदु युवतींचे आयुष्य बुरख्याखाली कवटाळले गेले. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मुळे आज घटस्फोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वर्ष २०२१ या एका वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या ३१ सहस्र घटना घडल्या. याचा अर्थ प्रतिदिन ८४ अत्याचाराच्या घटना घडल्या. हे अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होऊ शकते. शौर्यजागृतीसाठी आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांना रोखण्यासाठी आता महिलांनी स्वत: प्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सक्षम व्हायला हवे, असे तेजयुक्त मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने ‘जागतिक महिलादिना’निमित्त आयोजित ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या विषयावर ८ मार्च या दिवशी ‘ऑनलाईन’ व्याख्यान पार पडले. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या व्याख्यानाला १० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी महिला ‘ऑनलाईन’ उपस्थित होत्या.

या व्याख्यानाचा प्रारंभ प्रार्थना आणि शंखनादाने झाला. सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला. यानंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी ‘भारतीय परंपरेत देवीसमान पुजली जाणारी स्त्री, तर देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पहाण्याचा हीन दृष्टीकोन’, या सद्यःस्थितीविषयी उपस्थितांना अवगत केले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. प्राची शिंत्रे यांनी केले.

स्त्री धर्मशिक्षित झाल्यास तिच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस कुठल्याही वासनांधाचे होणार नाही ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

सद्गुरु (सुश्री ) स्वाती खाडये

आज अन्य धर्मातील महिलांना बुरखा घालायला लाज वाटत नाही. उलट त्याच स्त्रिया धर्मपालन व्हावे यासाठी अभिमानाने लढतात. हिंदु स्त्रियांनीही अभिमानाने धर्माचरण करावे. ‘कपाळावर कुंकू लावल्याने आज्ञाचक्रात स्थित श्री दुर्गादेवीचे तत्त्व जागृत होते’, असे शास्त्र सांगते. सात्त्विक पोशाख परिधान केल्याने आध्यात्मिक संरक्षककवच निर्माण होते. असे धर्माचरण करून दुर्गातत्त्व आणि आध्यात्मिक शक्ती यांचा लाभ घ्या अन् भारतीय परंपरेचा सार्थ अभिमान बाळगा ! जी स्त्री धर्मशिक्षित होईल, तिच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस कुठल्याही वासनांधाचे होणार नाही.

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनातील अनमोल सूत्रे

१. भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांच्या निमित्ताने, विशेषत: नवरात्रीत कुमारिकांचे पूजन केले जाते. याउलट स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीत महिला व्यासपिठावर जाऊन चित्रपटांतील गाण्यांवर बिभत्सपणे नाचतात अन् याचे वाईट वाटण्याऐवजी अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते.

२. प्रसारमाध्यमांतून एकीकडे सनी लिओन सारख्या अश्लीलतेला प्रोत्साहन देणार्‍या अभिनेत्रींच्या समर्थनार्थ अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गायले जातात, तर दुसरीकडे अनाथांसाठी आयुष्य वेचणार्‍या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचे विदेशात कौतुक झाले आणि नंतर भारतातील प्रसारमाध्यमांना जाग आली.

३. ‘टीव्ही’वरील कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झालेल्या मालिका पाहिल्याने परिणामस्वरूप देशातील माता-भगिनींची कुटुंबेही प्रत्यक्षात उद्ध्वस्त झाली. यामुळे एकत्रित कुटुंबात मुलांवर होणारे संस्कारांचे प्रमाणही अत्यल्प झाले.

४. भारताला शूर, लढवय्या अशा क्रांतीकारक महिलांचा मोठा वारसा लाभला आहे. छत्रपती शहाजीराजे यांच्या अनुपस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी सर्व राज्यकारभार पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हिंदवी स्वराज्य निर्मितीचे संस्कार केले. आज ‘छत्रपती शिवराय जन्मावेत; पण शेजारच्या घरात’, अशी दयनीय स्थिती झाली आहे. माता-भगिनींनो, जर घराघरात राजमाता जिजाऊ निर्माण झाल्या, तर त्यांच्या पोटी घराघरात शिवरायच जन्माला येतील.

क्षणचित्रे

१. कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, मलकापूर येथे, तसेच कर्नाटक राज्यातील संकेश्वर येथील काही धर्मप्रेमी महिलांनी गटागटाने एकत्र येऊन भ्रमणभाषवर हे व्याख्यान ऐकले. यातील अनेकांकडे ‘अँड्रॉइड’ भ्रमणभाष नसल्याने ‘सद्गुरूंची वाणी ऐकायची आहे’ अन् ‘त्यातून पुष्कळ शिकायला मिळेल’, हा भाव असल्याने अनेक ठिकाणी धर्मप्रेमी महिलांनी एकत्र येऊन व्याख्यान ऐकले.

२. धर्मकार्यात सहभागी होण्याच्या आवाहनाला अनेक महिलांनी प्रतिसाद देत संस्थेला त्वरित संपर्क केला आणि धर्मप्रसाराचे कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.

वैशिष्ट्यपूर्ण

१. ‘सद्गुरु स्वातीताई यांच्या क्षात्रतेजयुक्त वाणीने स्वत:मध्ये शक्तीतत्त्वाची जागृती झाली’, असे उपस्थितांनी अनुभवले.

२. सहस्रो महिलांनी ‘व्याख्यान अतिशय प्रेरणादायी होते’, ‘अशी व्याख्याने वारंवार व्हायला हवीत’, असे अभिप्राय ऑनलाईन पाठवले.

व्याख्यानाच्या शेवटी करण्यात आलेले आवाहन !

ताई सहन करू नकोस, नराधमांच्या अत्याचाराला
जागव तुझ्यातील दुर्गा, सिद्ध हो प्रत्युत्तराला
आदिशक्तीच्या जागराने, उभी ठाक शौर्यजागृतीला
जगदंबेच्या शौर्यशक्तीच्या बळाने, धडा शिकव वासनांधाला

आवाहन शरणागतीचे, त्रिशूलधारी महिषासूरमर्दिनीला
दुष्टवृत्ती कितीही असो, तू जाग महाकालीच्या जागरणाला

उदो उदो अंबेचा करोनी, प्रकट होईल भवानी
टाप नाही कुणाची, तू तर दुर्गेची रणरागिणी
होय ताई तूच दुर्गा, तूच भवानी, तूच चंडी आणि तूच काली, तूच अंबा, तूच जगदंबा
तुझ्यातच विश्वरक्षिती, वरदायिनी आदिशक्ती आहे आणि म्हणून…

उठ भगिनी जागी हो ! चंडि-दुर्गा-काली हो ! अबला नको तू रणरागिणी हो !
रणात लढणारी आदिशक्ती हो ! दुर्गेची तू रणरागिणी हो !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *