हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
आगरा (उत्तरप्रदेश) – सध्याच्या परिस्थितीमध्ये सनातन धर्माचे कार्य बर्याच ठिकाणी होत आहे; पण साधनेच्या बळाच्या अभावामुळे अपेक्षित अशी फलनिष्पत्ती मिळत नाही. साधना केल्यामुळे आपल्यामध्ये दैवी शक्तींचा उगम होऊन साक्षात् ईश्वरच आपल्याकडून धर्मकार्य करवून घेतो. त्यामुळे अल्प मनुष्यबळामध्ये आणि अल्पक्षमतेमध्ये भव्य दिव्य कार्य होते, हे लक्षात घेऊन ‘आपण साधनाच केली पाहिजे आणि समाजालाही साधनेसाठी प्रवृत्त केले पाहिजे’, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील ‘आगरा डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’चे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र पेंसियानी (आय.ए.एस्. – भारतीय प्रशासकीय सेवा) यांची भेट सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. पेंसियानी यांचे आई-वडील, तसेच समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके हेही उपस्थित होते.
सनातन संस्था, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य पाहून मी प्रभावित झालो ! – डॉ. राजेंद्र पेंसियानीसनातन संस्था,‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’ आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य पाहून मी प्रभावित झालो. सनातन संस्था अध्यात्मप्रसाराचे कार्य प्रभावीपणे करत आहे, तसेच एस्.एस्.आर्.एफ्. करत असलेले शोधनिबंध सिद्ध करण्याचे कार्य पाहून समाज नक्कीच धर्माचरण करण्यास प्रेरित होईल, असे वाटते. |
या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘आचारधर्माचे महत्त्व, धर्माचरण आणि साधना केल्याने काय लाभ होतात ?’ याविषयी जे मार्गदर्शन केले, ते डॉ. पेंसियानी अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतले. याचसमवेत सध्याच्या विज्ञानयुगात लोकांना धर्माचरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेले शोधकार्य ऐकून डॉ. पेंसियानी यांना कौतुक वाटले, तसेच ‘आधुनिक उपकरणांद्वारे केलेले शोधकार्य विविध स्तरांवर दाखवून समाजाला साधनेकडे आपण वळवू शकतो’, याची डॉ. पेंसियानी यांना निश्चिती झाली.
डॉ. राजेंद्र पेंसियानी यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान दाखवून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून घेतले धर्माचरणाविषयी मार्गदर्शन !
डॉ. पेंसियानी यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना त्यांचे शासकीय निवासस्थान दाखवले. त्या निवासस्थानामध्ये डॉ. पेंसियानी यांनी शिवाचे एक छोटे मंदिर बांधले असून त्यामध्ये भगवान शिवासह अन्य देवतांच्याही मूर्ती आहेत. त्या मंदिरात डॉ. पेंसियानी नित्यनेमाने पूजा आणि साधना करतात. डॉ. पेंसियानी यांनी त्यांच्या निवासस्थानी ३ देशी गायींचे पालनही केले आहे. ते प्रतिदिन यज्ञ करतात. त्यामुळे शासकीय निवासस्थानातील वातावरणही पुष्कळ सात्त्विक जाणवत होते. या भेटीच्या वेळी डॉ. पेंसियानी यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना ‘सनातन धर्माच्या उद्धाराचे कार्य करण्यासाठी मी अजून काय करू शकतो ?’ याविषयी मार्गदर्शन घेतले.
सद्गुरु डॉ. पिंगळे यांना आणि त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्याला मंदिरात आलेली अनुभूती
डॉ. पेंसियानी यांच्या निवासस्थानी असलेल्या मंदिरात सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी दर्शन घेतले. त्या वेळी त्यांच्या जिभेवर गोड लाळ येत होती. मंदिरामध्ये अष्टगंधाचा सुगंधही येत होता. अशीच अनुभूती श्री. कार्तिक साळुंके यांनाही आली.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. सद्गुरु डॉ. पिंगळे यांना भेटल्यावर डॉ. पेंसियानी यांनी त्यांच्या चरणी वाकून नमस्कार केला. याचसमवेत सद्गुरु डॉ. पिंगळे परत जाण्यासाठी निघाले असतांना डॉ. पेंसियानी यांनी घराबाहेर त्यांना सर्व कर्मचार्यांसमोर पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला. यातून त्यांचा संतांप्रतीचा भाव, नम्रता आणि शिकण्याची वृत्ती हे गुण शिकायला मिळाले.
२. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याशी बोलत असतांना डॉ. पेंसियानी यांना ‘३ वेळा संपूर्ण शरिरात कंपन झाले’, असे जाणवल्याचे त्यांनी स्वतःहून सांगितले.