Menu Close

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !

मुंबई – मुंबई येथे १२ आणि १३ मार्च या दिवशी २ दिवसांचे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमच घेण्यात आलेल्या या अधिवेशनात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांचे १४३ हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. बहुतांश हिंदुत्वनिष्ठांनी भगवंताचे अधिष्ठान ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले, तर काहींनी साधना समजून नामजप चालू केल्याचे सांगितले. साधनेला प्रारंभ केलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी त्याविषयीचे अनुभव सांगितले. ‘हिंदुत्वाच्या कार्याला साधनेचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी करणे’, हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. भगवंताच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निश्चय उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केला. संतांची वंदनीय उपस्थिती आणि हिंदुत्वनिष्ठांची धर्मकार्याची तीव्र तळमळ यांमुळे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हे अधिवेशन पार पडले.

अधिवेशनाचे स्वरूप !

राष्ट्र आणि धर्म यांवरील विविध आघात, हिंदूंचे संघटन, कायदेविषयक  मार्गदर्शन, साधना आदी विविध विषयांवर मार्गदर्शन, धर्मकार्य करत असतांना आलेल्या विविध स्वरूपाच्या अनुभवांची देवाणघेवाण आणि गटचर्चा असे या अधिवेशनाचे स्वरूप होते. आगामी काळात कृतीच्या स्तरावर कार्याची दिशा अधिवेशनात निश्चित करण्यात आली. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी उपस्थितांना साधनेविषयी मार्गदर्शन करून हिंदुत्वनिष्ठांच्या शंकाचे निरसन केले. समारोपाच्या कार्याक्रमात श्री. रणजित सावरकर, डॉ. विजय जंगम आणि श्री. चेतन राजहंस हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. अधिवेशनाच्या समारोपात हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी ठराव संमत करण्यात आले.

सद्गुरु, संत आणि हरिभक्त परायण यांची वंदनीय उपस्थिती !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव, श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक पू. मोडक महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रदीप महाराज पाटील, वसई (मेधे) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, महाराष्ट्र प्रदेश वारकरी संप्रदायाच्या तीर्थक्षेत्र समितीचे कार्यकारी प्रमुख ह.भ.प. सुभाष गोविंदबुवा बन

वक्त्यांनी मांडलेले राष्ट्र-धर्म विषयक विचार !

हिंदु धर्माला राजाश्रय देणार्‍यांना सत्तेत आणले पाहिजे ! – पू. मोडक महाराज, संस्थापक, श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट

प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाच्या मनात सनातन संस्था आणि हिंदु धर्म यांविषयी प्रेमभावना निर्माण झाली आहे. आपल्या हाती भगवंताने धर्मरक्षणाचा झेंडा दिला आहे. धर्मकार्य वेगवेगळे असले, तरी ‘हिंदु धर्माचे रक्षण’ हाच उद्देश आहे. पूर्वी राजाश्रय असल्यामुळे हिंदु धर्म प्रबळ होता. सद्यस्थितीत राजाश्रय नसल्यामुळे धर्मरक्षणाचे कार्य करावे लागणार आहे. यासाठी धर्माला राजाश्रय देणार्‍यांना सत्तेत आणला पाहिजे. जेथे संत असतात, तेथे भगवंत असतो आणि जेथे भगवंत आहे, तेथे विजय निश्चित आहे. भगवंतामुळेच कार्य सिद्धीस जाते.

‘हिंदु राष्ट्र’ हे राष्ट्रीय आंदोलन झाले पाहिजे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

विश्वयुद्धाला प्रारंभ झाला आहे. येणार्‍या काळात भारतातही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करायला हवी. भविष्यात आपल्याला रस्त्यावर उतरून हिंदु बांधवांचे रक्षण करावे लागेल. अशा वेळी धर्मनिष्ठ, राष्ट्रभक्त आणि सज्जन हिंदूंचे रक्षण करणे हे आपले प्राधान्य असेल. हे कार्य आपल्याला संघटितपणे करायचे आहे. आपत्काळात व्यक्तीनिष्ठ किंवा पक्षनिष्ठ न रहाता आपण धर्माच्या बाजूने असणार्‍यांच्या समवेत रहायला हवे. हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी आपण एकत्र यायला हवे. हिंदु राष्ट्र हे ‘राष्ट्रीय आंदोलन’ झाले पाहिजे. ‘आपण श्रीकृष्णाचे सेवक आहोत’, असा भाव ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करायला हवे.

श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन धर्मसंस्थापनेसाठी कार्य करूया ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

भारताचा संबंध नसतांना गांधीनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. या आंदोलनातून मलबार येथे हिंदूंचे सर्वांत मोठे धर्मांतर करण्यात आले. सहस्रावधी हिंदु स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले. पंजाबमध्येही हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या; मात्र गांधींनी याचा कधीही निषेध केला नाही. ‘इतिहासातून शिका. इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती करू नका’, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शिकवण होती. आजही भारतातील प्रत्येक भागात ‘छोटे पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत. शत्रूंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कृष्णनीतीचा उपयोग करायला हवा. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही; त्याने युद्ध करण्यासाठी प्रेरणा दिली. आपणही भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन धर्मसंस्थापनेसाठी कार्य करायला हवे. ‘रामराज्य स्थापन करणे’, हा आपला उद्देश आहे, हे विसरता कामा नये.

संघटना वेगवेगळ्या असल्या, तरी हिंदु राष्ट्राची स्थापना हेच आपले ध्येय ! – डॉ. विजय जंगम, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

लिंगायत समाज हिंदु नसल्याचा भ्रम पसरवण्यात आला होता. हे मतपेढीचे राजकारण आहे. हिंदू संघटित होऊ नयेत, यासाठी जातीव्यवस्थेचे स्तोम माजवण्याचे काँग्रेसचे षड्यंत्र आहे. लिंगायत आणि वीरशैव हे दोन्ही ‘हिंदु’च आहेत, याची निश्चिती बाळगा. हिंदु राष्ट्रासाठी आमचे बलीदान झाले तरी पर्वा नाही. इतिहासात आमचे नाव राहो अथवा न राहो; परंतु ‘मी एका हिंदूच्या घरात जन्माला आलो आहे’, असे अभिमानाने म्हणू शकू, असे कार्य करायला हवे. संघटना आणि त्यांची कार्यप्रणाली वेगवेगळी असली, तरी आपले धेय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’ हेच आहे.

हिंदू संघटित झाले, तरच भारताला उज्ज्वल भविष्य असेल ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, संचालक, परशुराम तपोवन आश्रम, वसई

हिंदूंना धर्म समजू न देण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. त्यामुळे हिंदूंनी धर्म समजून घेऊन त्यानुसार आचरण करणे आवश्यक आहे, तरच त्यांच्यामध्ये क्रांतीची भावना निर्माण होऊ शकते. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही आपण गोहत्या बंद करू शकलो नाही. भावी पिढीला खरा इतिहास शिकवू शकलो नाही. आज हे कार्य करण्याची आवश्यकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत पंडित नेहरू यांना ‘राज्यघटनेत संशोधन करावे लागेल’, असे सांगितले होते. येणार्‍या काळात हिंदू जागृत होऊन संघटित झाले, तरच भारताला उज्ज्वल भविष्य असेल.

मागून मिळवण्याचा नव्हे, तर ‘हिंदु राष्ट्र’ हा स्थापन करण्याचा विषय ! – ह.भ.प. प्रदीप महाराज पाटील, पालघर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर पुष्कळ प्रमाणात धर्मांतर होत आहे. तेथील एका पाड्यात दुर्गादेवीच्या नावाचे चहाचे दुकान चालू करून त्याद्वारे ख्रिस्ती धर्मांतराचा प्रकार चालू होता. त्या दुकानात ख्रिस्त्यांची पुस्तके मिळाली. या  प्रकारामुळे तेथील स्थानिक जागृत होऊ लागले आहेत. हिंदु धर्मावर जग टिकले आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हा मागण्याचा विषय नाही. ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

सीएए कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला अमली पदार्थ विक्रीचा निधी ! – अधिवक्ता एस्. बालकृष्णन, मुंबई उच्च न्यायालय

अमली पदार्थ विक्रीचा निधी काही राष्ट्रद्रोही संघटनांना पुरवला जात आहे. याच संघटनांचा सीएए कायद्याला विरोध होता. रोहिंयांना जम्मू-काश्मीरमध्ये आणण्यात हेच पैसे वापरण्यात आले. काही खासगी बंदरावर अमली पदार्थांची देवघेव होत आहे. अशी संवेदनशील बंदरे शासनाच्या नियंत्रणाखाली येणे आवश्यक आहे.

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, ही काळ्या दगडावरची रेघ ! – ह.भ.प. सुभाष गोविंदबुवा बन, तीर्थक्षेत्र समितीचे कार्यकारी प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश वारकरी संप्रदाय

धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही मशिदींवरील भोंगे उतरवले जात नाहीत. हा न्यायालयाचा अवमान आहे. या विरोधात ठिकठिकाणी तक्रारी करायला हव्यात. पाच बोटे एकत्र केल्यावरच मूठ सिद्ध होते आणि मूठ केल्यावरच तिच्यामध्ये ताकद येते. हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधातही हिंदूंनी असेच एकत्र यायला हवे. आपल्या पाल्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

प्रतिसाद

१. ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेवरील संकटाची भयावहता श्री. राजहंस यांनी सांगितल्यावर त्याविषयी जागृती करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची सिद्धता हिंदुत्वनिष्ठांनी दर्शवली.

२. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेऊन ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा जयघोष करत हिंदु राष्ट्रासाठी झोकून देऊन कार्य करण्याचा निर्धार सर्वांनी केला.

सहभागी संघटना

धार्मिक : वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी परिषद, समस्त वारकरी पडकरी दिंडी समाज संघटना, श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, श्री परशुराम तपोवन आश्रम, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, योग वेदांत सेवा समिती, शिवहोम योग ॲकॅडमी, श्री श्वेतांबर भूमीपूजन जैन संघ (पनवेल) आणि सनातन संस्था

हिंदुत्वनिष्ठ : वज्रदल संघटना, भगवा गार्ड, स्वराज्य सामाजिक संघटना (रायगड), जय श्रीराम सेना, हिंदू महासभा, बजरंग दल, हिंदू टास्क फोर्स, सॅफ्रन थिंक टँक, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, क्षत्रिय मराठा आणि हिंदु जनजागृती समिती

सामाजिक : अखिल भारतीय ब्राह्मण विकास परिषद, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, हिंदू गोवंश रक्षा समिती, लोक सेवा मंडळ, शिवसृष्टी असोसिएशन, गोरक्षक मंगल पाटील सामाजिक गोपालन संस्था पेण, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विलेपार्ले लोकसेवा मंडळ, सहयोग गोविंदा पथक (ठाणे)

धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी झाले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *