महिला मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !
अमरावती – आज स्त्री सुशिक्षित झाली आहे; पण जर तिला स्वरक्षण करता आले, तरच ती खर्या अर्थाने सक्षम होणार आहे. बलात्काराच्या घटना घडल्यावर जागृत होणार्या स्त्रियांनी केवळ मेणबत्ती घेऊन मोर्चे न काढता स्त्रीकडे वाईट दृष्टीने पहाणार्या नराधमाला कायमचा धडा शिकवण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रत्येक युवती आणि स्त्री यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून आत्मनिर्भर व्हायला हवे. आज राष्ट्ररक्षण करणारी, स्वतःचे रक्षण करू शकणारी, सुसंस्कारित पिढी घडवणार्या स्त्रियांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अधिवक्त्या (सौ.) प्राजक्ता जामोदे यांनी अंबा मंगलम् कार्यालय येथे भरारी संघ आणि मातोश्री संघ यांच्या वतीने आयोजित भव्य महिला मेळाव्यामध्ये केले.
या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. अर्चना मावळे यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. विषय ऐकून आणि प्रात्यक्षिके बघून उपस्थित महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याचा लाभ परिसरातील ३५० हून अधिक महिलांनी घेतला.