Menu Close

खडकवासला येथील ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या सहभागाने मोहीम १०० टक्के यशस्वी !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ !

जलाशयाच्या भोवती मानवी कडे करून उभे असलेले हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य संघटना यांचे कार्यकर्ते

पुणे – सण आणि उत्सव यांमध्ये शिरलेले अपप्रकार दूर व्हावेत यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध विषयांवर जनप्रबोधन अभियान राबवण्यात येते. धूलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, खडकवासला ग्रामस्थ, प्रशासन आणि समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत प्रबोधनात्मक फलक हातात धरलेल्या कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी केली होती. धूलीवंदनाच्या दिवशी जलदेवतेला प्रार्थना, भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून आणि नारळ वाढवून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

धर्मशिक्षणाच्या अभावी सणांमध्ये शिरलेले अपप्रकार रोखले जावेत त्यासाठी समितीचे कार्यकर्ते नागरिकांचे प्रबोधन करत होते. होळी आणि रंगपंचमी यांचे धर्मशास्त्र सांगणारे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे प्रबोधनात्मक फलकही कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. जलरक्षणाच्या या मोहिमेमध्ये १०० हून अधिक समितीचे कार्यकर्ते, जिज्ञासू, धर्मप्रेमी सहभागी झाले होते. २२ मार्च म्हणजे रंगपंचमीच्या दिवशीही सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. गेली १९ वर्षे यशस्वीरित्या राबवल्या जाणार्‍या या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, ‘आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिल’चे अध्यक्ष श्री. विवेक भोसले, ‘आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिल’चे संचालक गव्यशास्त्री डॉ. स्वानंद पंडित, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. पोपटराव शेलार, खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्री. राजेंद्र राऊत आणि दत्तात्रेय कापसे, श्री. महेश पाठक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर

उपस्थित मान्यवर

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे प्राध्यापक विठ्ठल जाधव उपस्थित होते. या व्यतिरिक्त ‘आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिल’चे संचालक गव्यशास्त्री डॉ. स्वानंद पंडित आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विवेक भोसले, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. पोपटराव शेलार, खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र राऊत अन् दत्तात्रय कापसे, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते, गोर्‍हे येथील ग्रामपंचायत सदस्य बाबा खिरीड, साहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, (निवृत्त) विंग कमांडर अजय महाजन, भारतीय जनता पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव अण्णा तापकीर, बाजीराव पारगे, दत्तात्रय जोरकर, तुळशीदास मते आदी मान्यवरांनी मोहिमेच्या ठिकाणी भेट दिली.

क्षणचित्रे

१. खडकवासला धरणाच्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेड लावून बंदोबस्त ठेवला होता, तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पडताळणी करण्यात येत होती.

२. चारचाकी गाडीच्या चालकांनी समितीची मोहीम आवडली म्हणून मोहीम पाहून टाळ्या वाजवल्या.

३. खानापूर येथील ‘वृंदावन नर्सरी’चे मालक श्री. नितीन राऊत सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन पाहून थांबले, तसेच त्यांनी सात्त्विक उत्पादनेही खरेदी केली.

४. सौ. सुचेता महाजन यांनी स्वतःहून समितीच्या कार्यकर्त्यांसाठी ताकाच्या ५-६ पिशव्या आणून दिल्या, तसेच या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

५. समितीची मोहीम पाहून पी.एम्.टी.चे चालक हात उंचावून मोहीम आवडल्याचे दर्शवत होते.

६. सौ. आरती संदीप पवार यांनी नाशिक येथे तसेच संभाजीनगर येथे असतांना सनातन संस्थेचे प्रदर्शन आणि उपक्रम पहिले होते. त्यानंतर त्यांनी खडकवासला येथे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी असलेले पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून मुख्य कक्षावर येऊन ‘मला कार्यामध्ये सहभागी व्हायचे आहे’, अशी इच्छा व्यक्त केली. ‘माझ्या परीने या धर्मकार्यामध्ये जेवढे योगदान देता येईल तेवढे देण्याचा निश्चितच प्रयत्न करेन’, असे सांगितले, तसेच ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गाला जोडण्याची सिद्धता दर्शवली. त्यांच्या सोसायटीमधील तरुण मुलींना स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला जोडण्यास उद्युक्त करण्यासाठीही प्रयत्न करेन, असे सांगितले.

प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता समाजसेवा करण्याचे व्रत समितीच्या कार्यकर्त्यांनी अंगिकारले आहे ! – भीमराव अण्णा तापकीर, आमदार, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहिमे’मध्ये समितीचे सदस्य, तरुण आणि महिला खडा पहारा देऊन उपक्रमात सहभागी असतात. पाण्याची काळजी घेणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता स्वतःचा कार्यक्रम समजून समाजसेवा करण्याचे व्रत अंगिकारले आहे. गेल्या २० वर्षांपासून प्रतिवर्षी ही मोहीम समितीचे कार्यकर्ते सेवाभावाने करत आहेत. समितीच्या उपक्रमांना कायमच सहकार्य करू.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१. डॉ. स्वानंद पंडित, गव्यशास्त्री आणि ‘आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिल’चे राष्ट्रीय कार्यकारी संचालक – पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून हिंदु संस्कृतीचे विकृतीकरण होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी समिती करत असलेला उपक्रम स्तुत्य आहे. हिंदु संस्कृतीचा अभ्यास आणि पालन करून सण साजरे करायला हवेत. हे करतांना समाजाला, निसर्गाला कोणतीही हानी पोचत नाही ना ? याचाही सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हायला हवे. पाण्याचे संरक्षण करणे हे आपले सर्वांचे दायित्व आहे. पाणी, वृक्ष आणि गोमाता ही प्राकृतिक संसाधने प्रत्येकाने जतन केली पाहिजेत. आपल्या हिंदु संस्कृतीला जोडले गेलेले विज्ञान पुढे आणले पाहिजे आणि पाश्चात्त्य संस्कृतीचे उदात्तीकरण थांबवायला हवे.

२. श्री. पोपटराव शेलार, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता – ‘जलाशय रक्षण’ मोहीम हा उपक्रम स्तुत्य असून प्रतिवर्षी समितीचे कार्यकर्ते या मोहिमेमध्ये उपस्थित रहातात, हे कौतुकास्पद आहे. या वर्षीही १६ ते २२ मार्च या कालावधीत ‘जलसाक्षरता’ अभियान चालू आहे. त्या माध्यमातून सर्व जनतेला पाण्याचे महत्त्व सांगून उपलब्ध असणारे पाणी योग्यपद्धतीने वापरण्यासाठी प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

३. श्री. रूपेश मते, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक – समितीचा ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीम हा उपक्रम स्तुत्य असून आमचे कायमच सहकार्य राहील.

४. श्री. बाळासाहेब नवले, माजी नगरसेवक – उन्हाची तमा न बाळगता समितीचे सर्व कार्यकर्ते मानवी साखळीद्वारे धरण रक्षणाचे कार्य करत आहेत. पर्यावरणाचा र्‍हास न होण्यासाठी कार्यकर्ते करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

५. श्री. विवेक भोसले, ‘आयुर्वेद विज्ञान कौन्सिल’चे राष्ट्रीय अध्यक्ष – पर्यावरण वाचवणे हे प्रत्येकाचे दायित्व आहे. प्रत्येकाने हे भान ठेवून आचरण केले, तर पुढच्या पिढीला सुदृढ पर्यावरण आणि वातावरण आपल्याला देता येईल. समिती करत असलेल्या कार्याला कोणत्याही प्रकारचे साहाय्य लागल्यास ते तत्परतेने देऊ.

६. श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक – शाळा महाविद्यालयांमध्ये सध्या हिंदु धर्म तसेच सण साजरे करण्याचे शास्त्र आणि त्याचे महत्त्व काय आहे ? हे शिकवले जात नाही. त्यामुळे मुलांना सण-उत्सवांमागील अध्यात्मशास्त्र ठाऊक नसते. ते शास्त्र समजून जर सण-उत्सव साजरे केले, तर त्याचे पावित्र्य राखले जाईल. हिंदु जनजागृती समिती करत असलेली ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीम १९ वर्षे अविरतपणे चालू आहे आणि ती १०० टक्के यशस्वीही झाली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *