सोलापूर – जुळे सोलापूर येथील लक्ष्मी मंदिराच्या बाहेर समाजातील विविध लोकांनी घरातील देवतांच्या जुन्या प्रतिमा ठेवून दिल्या होत्या. यामुळे देवतांची विटंबना होत होती. ही गोष्ट सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. अरुण कदम यांना समजल्यावर त्यांनी ही घटना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितली. समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमी युवकांना एकत्र घेऊन या प्रतिमांचे विसर्जन केले. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते देवतांच्या प्रतिमा अग्नीसमर्पण किंवा नदीत विसर्जन करत नाहीत. यावरून समाजात धर्मशिक्षण देणे किती महत्त्वाचे आहे, हेच लक्षात येते. देवतांच्या प्रतिमांची विटंबना होते, हे लक्षात आल्यावर ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणारे सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. अरुण कदम, तसेच धर्मप्रेमी युवक यांचे अभिनंदन ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
१. प्रारंभी धर्मप्रेमी युवकांनी बाहेर ठेवलेल्या देवतांच्या प्रतिमा चौकटीमधून बाहेर काढून धर्मप्रेमी पुरोहित श्री. कृष्णाहरि क्यातम यांच्याकडून विधीवत् मंत्रपठण करून अग्नीत विसर्जन केल्या. ही कृती करण्यापूर्वी धर्मप्रेमींनी प्रार्थना केली आणि ‘ही कृती सेवा म्हणून करत आहे’, असा भाव ठेवला.
२. या संदर्भात धर्मप्रेमी श्री. अरुण कदम म्हणाले, ‘‘देवतांच्या प्रतिमा पडलेल्या पाहून वाईट वाटायचे; मात्र त्या संदर्भात योग्य कृती काय करायची, हे लक्षात येत नव्हते. समितीच्या दिशादर्शनामुळे देवतांची विटंबना टाळणे शक्य झाले.’’
३. या वेळी मिळालेल्या काही मूर्ती एकत्रित करून तलावात विसर्जित केल्या.
४. विडी घरकुल येथील श्री गणेश मंदिर आणि श्री पंचमूर्ती मंदिर या मंदिरांच्या परिसरातही धर्मप्रेमींनी अशीच मोहीम राबवली. या प्रसंगी पंचमूर्ती मंदिराचे अध्यक्ष श्री. अजय परशी हे तेथे उपस्थित होते. श्री. परशी यांनी ‘या कार्यासाठी किती पैसे तुम्हाला देऊ’, असे विचारले.’ त्यांना धर्मप्रेमींनी ‘हे आम्ही धर्मकार्य म्हणून करत आहोत आणि तुम्हीही यात सहभागी होऊ शकतो’, असे सांगितले. या मोहिमेत कुमठा नाका, हुचेश्वर नगरयेथील आणि सरवदेनगर, विडी घरकुल येथील धर्मप्रेमी सहभागी होते.
उपक्रमात सहभागी धर्मप्रेमी
सर्वश्री साहिल गायकवाड, अभिषेक नागराळे, नरेश गणुरे, राकेश मोतीवाले, करण निली, बालाजी राऊत, नागराज कडता, शिवराज कडता, विरेश हरसुरे, सोमनाथ जमादार, सागर हुंडेकरी, गणेश हरसुरे, शांतलिंगेश्वर पाटील, आमरेश कडता, माधव पुजारी, संकेत मद्रे, नागराज शिवरायगोळ, धनंजय बोकडे
ही कृती पूर्ण झाल्यावर एकत्र आलेल्या ३५ धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची प्रार्थना केली. यात मंदिरातील पुजारीही सहभागी झाले होते. |