हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशन
विजयपूर (कर्नाटक) – काही वर्षांपूर्वी हिंदू जर उघडपणे हिंदु धर्माविषयी बोलले, तर त्यांच्यावर खटला प्रविष्ट होईल, अशी स्थिती होती. त्याच वेळी हिंदु जनजागृती समितीने ‘भारत धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र होणार’, असे सांगितले होते. त्या वेळी हे ऐकणारे ‘हे कसे शक्य आहे ?’ असे सांगत टिंगल करत असत; परंतु आता आपण सर्व बघत आहोत की, केवळ भारतातच नव्हे, तर जगात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, अशी स्थिती आहे. सध्या केंद्रात, तसेच राज्यात हिंदुत्वाचे धोरण असलेले सरकार आहे; म्हणून हिंदूंनी निद्रिस्त न रहाता सदैव जागृत तसेच संघटित राहिले पाहिजे. तसे न झाल्यास गझनी, बाबर यांचा काळ पुन्हा येईल. गेल्या २ वर्षांत कोरोनामुळे असे कार्यक्रम झाले नाहीत. आज हिंदु जनजागृती समितीने नियोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाने पुष्कळ आनंद होत आहे, असे जेवर्गी येथील करुणेश्वर मठाचे पू. सिद्दलिंग महास्वामीजी म्हणाले. येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात २७ मार्च २०० या दिवशी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे पू. सिद्दलिंग महास्वामीजींनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. विजय रेवणकर आणि सनातन संस्थेचे धर्मप्रसारक श्री. काशीनाथ प्रभु यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अधिवेशनात देवदुर्ग, मानवी, सिंधनूर, बदामी, मुद्देबिहाळ, सिंदगी, बागलकोट, केरूरु, विजयपूर तसेच आणखी अनेक ठिकाणांहून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योगपती आदी उपस्थित होते.