Menu Close

गडदुर्गांचे पावित्र्य जपा !

महाराष्ट्रात कुठेही गडदुर्गांवर फिरायला गेले की, गडांवर अनेक ठिकाणी असंख्य प्लास्टिक आणि मद्य यांच्या बाटल्या, तसेच अन्य प्लास्टिकचा कचरा पाहून मन पुष्कळ अस्वस्थ होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून हे गड स्वराज्यात आणले आहेत. त्यांनी स्वतःचे सर्वस्व देव, देश, धर्म यांकरता दिले आणि सर्वांचे अस्तित्व त्यांनी टिकवले. असे असतांना आम्ही मात्र गडदुर्गांची दुःस्थिती करून त्यांचे अस्तित्वच मिटवायला निघालो आहोत.

गडदुर्ग ही आपल्यासाठी पवित्र भूमी आहे. तेथील प्रत्येक निर्जीव घटकांतही शिवरायांचे अंश सामावलेले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी केवळ दिखावा आणि अभिमान म्हणून न मिरवता कृतज्ञता म्हणून गडदुर्गांवर स्वच्छता नीटनेटकेपणाने असायलाच हवी. कुणी प्लास्टिकचा कचरा करत असेल, तर त्यांना समज द्यायला हवी. अनेक मद्यप्रेमी गडावर जाऊन दारू पितात. त्यांनाही अटकाव घालायला हवा. आपण ‘शिवरायांच्या स्वराज्याचे विश्वस्त आहोत’, असा आपला भाव हवा. शिवरायांनी पालट घडवण्याला प्रारंभ केला आणि त्यांनी पालट घडवून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी हिंदवी स्वराज्याची स्थापना नाही, तरी किमान गडदुर्गांची स्थिती बिघडवू न देणे तरी आपल्या हातात नक्कीच आहे.

 

जपानसारख्या प्रगत देशात सर्वत्र स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पहायला मिळतो. तेथे मुलांकडूनच शाळेचा वर्ग, परिसर स्वच्छ करून घेतला जातो. लहानपणापासून मुलांना स्वच्छतेविषयी सांगितल्यामुळे सर्वांना त्याची सवय होते. फुटबॉलचे सामने झाल्यानंतर परदेशी नागरिकांनी काही कचरा सोडला, तर त्यांना कचरापेटीतच तो टाकण्यास सांगितले जाते किंवा जपानी नागरिक स्वतः तो कचरा उचलून कचरापेटीत टाकतात. तेथील नागरिक सर्वसामान्य जागेविषयी एवढे जागरूक असतात, तर आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही स्वच्छ ठेवणे, हे आपले दायित्व आहे, हे ओळखून त्यासाठी प्रयत्नरत रहायला हवे.

– श्री. नीलेश देशमुख, सानपाडा, नवी मुंबई.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *