सांगवी (जिल्हा धाराशिव) – अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी देशातीलविविध राज्यांतील सेक्युलर सरकार आणि प्रशासन प्रतिवर्षी सरकारी निधीतून ‘इफ्तार पार्ट्यां’चे आयोजन करते; मात्र हिंदूंच्या कोणत्याही सणाला सरकारी निधीतून साहाय्य केलेले ऐकिवात नाही. संविधानातील ४८ व्या अनुच्छेदात ‘गोवंश हत्या बंदी’ असूनही आजवर सत्तेत असलेले सर्वपक्षीय शासनकर्ते देशस्तरावर गोहत्या बंदी कायदा बनवू शकलेले नाहीत. त्यामुळे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे यांनी केले. २४ मार्च या दिवशी तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करायच्या उपाययोजना’ या विषयावर तेथील धर्मप्रेमींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
सांगवी येथील धर्मप्रेमी सर्वश्री मेघराज बागल, अनिल पवार, तसेच सिंदफळ येथील दिनेश धनके हे गोरक्षणाचे कार्य अविरतपणे करत आहेत. या व्याख्यानाच्या निमित्ताने श्री. राजन बुणगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या व्याख्यानाचा प्रसार आणि पूर्वसिद्धता सांगवी येथील धर्मप्रेमी सर्वश्री अनिल पवार, मेघराज बागल, मंगेश काळे, रोहित बागल यांनी उत्स्फूर्तपणे केली होती. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संदीप बगडी, दीपक पलंगे, उमेश कदम, सुरेश नाईकवाडी, विनोद रसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.