मुंबई – लंडन येथे आंतरराष्ट्रीय पत्रकारिता महोत्सवात सहभागी होण्यासाठी निघालेल्या राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्यूब यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आले. कोरोनाच्या काळात विदेशातून आलेल्या आर्थिक निधीमध्ये अपहार केल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून राणा अय्यूब यांच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ काढण्यात आली आहे.
विमानतळावरील अधिकाऱ्यांनी अय्यूब यांना रोखल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर जाऊन राणा यांना चौकशीसाठी सहकार्य करण्याची सूचना दिली. राणा अय्यूब यांना १ एप्रिल या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी राणा अय्यूब यांचे १ कोटी ७७ लाख रुपये कह्यात घेतले आहेत. विमानतळावर रोखण्यात आल्यावर केलेल्या ‘ट्वीट’मध्ये राणा यांनी म्हटले आहे की, मी एका कार्यक्रमासाठी लंडन येथे जाणार होते. तेथून इटली येथे अन्य एका कार्यक्रमाला जाणार होते. हे दोन्ही कार्यक्रम पूर्वनियोजित होते. असे असतांनाही मला विमानतळावर अटकाव करण्यात आला. मला रोखल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स आला आहे.