विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – चेन्नईमधील राजभवनामध्ये २७ मार्च २०२२ या दिवशी सनातन धर्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामजन्मभूमीचा खटला लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् (वय ९४ वर्षे) यांना ‘सद्गुरु शिवानंद मूर्ती यांच्या स्मरणार्थ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अधिवक्ता के. परासरन् यांना हा पुरस्कार प्रमुख पाहुणे आणि तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी सन्माननीय पाहुणे म्हणून ‘तुघलक’ मासिकाचे संपादक श्री. एस्. गुरुमूर्ती आणि आंध्रप्रदेश सरकारचे माजी मुख्य सचिव श्री. एल्.व्ही. सुब्रह्मण्यम हेही उपस्थित होते. या वेळी प्रमुख आणि सन्माननीय पाहुणे यांनी भाषण केले. सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. वेणूजी यांनी सनातन संस्थेला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या वतीने श्री. बालाजे के. उपस्थित होते.
रामजन्मभूमीचा खटला आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना ! – अधिवक्ता के. परासरन्
रामजन्मभूमीचा खटला लढून तो आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना होती आणि मी त्याच्या चरणी सेवा करत होतो. रामजन्मभूमीचा खटला लढणे, हे कार्य एका व्यक्तीचे नाही, तर ते सांघिक कार्य होते. या खटल्यात मला साहाय्य करणार्या अधिवक्त्यांचा चमू हा रामायणातील वानर सेनेसारखा असून त्यांनी त्यांच्याप्रमाणेच सेवा केली आहे. वानर हे प्रभु श्रीरामांचे दूत असून ते रामासह अवतरित झाले होते.