हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बंटवाळ (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
मंगळुरू (कर्नाटक) – आज काही स्वार्थी हिंदु आपल्या स्वार्थासाठी हिंदुत्वाचा उपयोग करून त्याचा पायाच नष्ट करत आहेत. देवस्थाने अपवित्र करणे, त्यांचा विध्वंस करणे, अशी चुकीची कामे करत आहेत. हिंदूंमध्ये संघटितपणा नसल्याने हे सर्व घडत आहे. हिंदूंनो सावध व्हा. आपण जातपात विसरून संघटित झाल्यास आपल्या धार्मिक क्षेत्रांचे महत्त्व इतरांना समजेल आणि आपल्या देवस्थानांचे रक्षण आपणच करू शकू, असे प्रतिपादन रयत संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री. गिरीश कोट्टारी यांनी केले. बंटवाळ तालुक्यातील समाज सेवा सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्र मोगेर यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, लव्ह जिहाद, लँड जिहादची प्रकरणे सतत घडत आहेत. त्याविषयी आपण जागरूक होणे आवश्यक आहे. शिवमोग्गाच्या हर्ष या हिंदु कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यावर सरकारने कायद्याद्वारे कठोर कारवाई केली पाहिजे आणि हिंदू कार्यकर्त्यांना संरक्षण दिले पाहिजे. अशा दबावाला रोखण्यासाठी हिंदू राष्ट्राची स्थापना करणे, हा एकमेव उपाय आहे.