कर्नाटकमध्ये हिंदु संघटनांचे हिंदूंना आवाहन !
असे आवाहन करणार्या हिंदु संघटनांना ‘धर्मांध’ संबोधून ही समस्या सुटणार नाही, तर ‘असे आवाहन करण्याची वेळ का आली ?’, तसेच ‘त्यांना असुरक्षित का वाटू लागले आहे ?’, याची चौकशी करणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यामध्ये हिजाब, हलाल मांस, मशिदींवरील भोंगे यांनंतर मंदिरांमध्ये भाविकांना घेऊन येणार्या मुसलमान वाहतूक आस्थापनांच्या विरोधात हिंदु संघटनांनी मोहीम चालू केली आहे. ‘भारतरक्षण वेदिके (मंच)’ संघटनेचे प्रशांत बंगेरा यांनी, ‘हिंदूंनी तीर्थयात्रेला जातांना मुसलमान चालकांच्या गाडीत बसू नये. त्यांची टॅक्सी किंवा अन्य वाहन यांचा वापर करू नये. तसेच मुसलमान वाहतूक आस्थापनांच्या मालकीची वाहने वापरू नयेत. या आवाहनाला सर्व हिंदु संघटनांनी पाठिंबा द्यावा आणि लोकांमध्ये जागृती करावी’, असे आवाहन त्यांनी केले. श्रीराम सेनेने या आवाहनाला पाठिंबा दिला. राज्याचे मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी म्हटले, ‘मला या मोहिमेविषयी काहीही ठाऊक नाही.’
#Karnataka: Now campaign for banning #Muslim drivers during #temple visitshttps://t.co/IR8YNgi2AX
— Free Press Journal (@fpjindia) April 8, 2022
हिंदूंना ‘काफीर’ म्हणणारे तीर्थक्षेत्री नकोत ! – भारतरक्षण वेदिके
भारतरक्षण वेदिकेचे प्रमुख भरत शेट्टी म्हणाले, ‘‘आम्ही तीर्थक्षेत्री जातांना मांसाहार करत नाही. ज्यांचा हिंदूंच्या देवतांवर विश्वास नाही आणि जे मांसभक्षण करतात, त्यांच्यामुळे आमचा धर्म अन् संस्कृती यांचा अवमान होतो. ते आम्हाला ‘काफीर’ (अल्लाला न मानणारे) म्हणतात. ज्याप्रमाणे त्यांना त्यांचा धर्म महत्त्वाचा आहे, त्याप्रमाणे आम्हालाही आमचा धर्म महत्त्वाचा आहे.
१. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात असलेल्या प्रसिद्ध सवदत्ती यल्लम्मा तीर्थक्षेत्रातील मुसलमान व्यापारी आणि विक्रेते यांना धर्मादाय विभागाने नोटीस बजावावी’, अशी विनंती केली आहे. मुसलमान व्यापार्यांनी मंदिराजवळील त्यांची दुकाने रिकामी न केल्यास श्रीराम सेनेचे कार्यकर्ते धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन दुकाने रिकामी करण्याची मागणी करतील, असे त्यांनी सांगितले.
२. श्री. प्रमोद मुतालिक यांनी यापूर्वी उपसभापती आणि भाजप आमदार आनंद मामनी यांची भेट घेतली होती आणि अहिंदु व्यापार्यांना सावदत्ती येल्लम्मा तीर्थक्षेत्राच्या परिसरातून बाहेर काढण्याची विनंती केली होती. ‘लाखो यात्रेकरू मंदिराला भेट देतात आणि येथे ५० टक्क्यांहून अधिक मुसलमान व्यापारी त्यांचा व्यवसाय करतात’, असा दावाही त्यांनी केला होता.