सातारा – १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली. भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना सुरक्षिततेचे अभिवचन देऊनही काश्मिरी हिंदूंना ३२ वर्षे झाले, तरी विस्थापित जीवन जगावे लागत आहे. काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन कधी होणार ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी उपस्थित केला.
पाटण तालुक्यातील वेखंडवाडी या गावातील श्री काळभैरवनाथ ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या. सभास्थळी वेखंडवाडीचे सरपंच हणमंत पवार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळकुटे, ग्रामपंचायत सदस्य सौ. स्वाती संतोष पवार, तारळे येथील शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक माणिक पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेचा लाभ वेखंडवाडी पंचक्रोशितील १०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी घेतला.
या वेळी सौ. रूपा महाडिक म्हणाल्या की, नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला विरोध झाला. एका मुसलमानाने या चित्रपटाविरुद्ध न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. काही मुसलमान चित्रपटगृह मालकांनी या चित्रपटाच्या ‘प्रमोशन’चे फलक आणि भित्तीपत्रकेही लावली नाहीत. काही ठिकाणी चित्रपटाचा आवाज बंद करण्यात आला, तर काही ठिकाणी ‘हाऊसफुल’चे फलक लावले; मात्र प्रत्यक्षात चित्रपटगृह मोकळेच होते. येनकेनप्रकारेण लोकांसमोर सत्य जाऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. ही आहे हिंदूंच्या समस्या चित्रपटांद्वारे समाजासमोर मांडणाऱ्या निर्मात्यांची गळचेपी ! ही स्थिती पालटण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’च आवश्यक आहे.