Menu Close

रामराज्य येण्यासाठी प्रजेनेही प्रयत्न करायला हवेत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

रामराज्य येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली तळमळ अभिनंदनीय आहे ! जनतेने साधना करून ईश्‍वरी अधिष्ठान मिळवल्यास श्रीरामाला अपेक्षित असलेले रामराज्य लवकरच भूवरी अवतरेल, यात शंका नाही ! यासाठी जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेण्यासाठी शासनानेही प्रयत्न करावेत, अशी धर्मप्रेमींची अपेक्षा आहे !

डिचोली (गोवा) – अयोध्याप्रश्‍नी निर्णायक तोडगा निघून अनेक रामभक्तांच्या त्यागातून आज भव्य श्रीराममंदिर उभारले जात आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. रामराज्य यावे, अशी सर्वांचीच इच्छा असते; मात्र त्यासाठी प्रजेनेही सर्व ते प्रयत्न केले पाहिजेत. मला जनतेने जनसेवा करण्याची संधी दिली आहे. त्याचा योग्य उपयोग करत प्रजेला सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी अन् राज्याच्या विकासासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न रहातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. विश्‍व हिंदु परिषद, तसेच रामोत्सव समिती, डिचोली यांच्या वतीने डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रामोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारणीच्या कार्यात एक गोमंतकीय अभियंता योगदान देत आहे. हे अभिनंदनास्पद आहे. गोव्यात रामराज्य आणण्यासाठी नवीन पिढीला रामभक्त निर्माण करायला हवे आणि त्यासाठी बालमनावर योग्य संस्कार करणे आवश्यक आहे.’’

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते श्रीरामाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, नगराध्यक्ष कुंदन फळारी आदींची उपस्थिती होती. शांतीसागर हावळे हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *