Menu Close

सर्वांचा योगक्षेम ईश्वर वहाणार आहे, त्यासाठी ईश्वराचे भक्त बनणे आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

बलोपासना वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन

श्री. मनोज खाडये
सोलापूर – वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. देश पारतंत्र्यात असतांना भारताने अन्य देशांकडून कर्ज घेतले होते, ते कर्ज आजही आपण फेडत आहोत. सध्या देशात युद्धजन्य परीस्थिती आहे, पुढे तिसरे महायुद्धही होणार आहे. या युद्धामध्ये ‘५० टक्के लोकसंख्या नष्ट होईल’, असे अनेक द्रष्टे आणि संत यांनी सांगितले आहे. अशा भीषण परिस्थितीत आताचा युवावर्ग राष्ट्राचा विचार न करता केवळ स्वसुखाचा विचार करण्यात व्यस्त आहे. ईश्वरी नियोजनानुसार हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे; मात्र त्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान अपेक्षित आहे. आपला योगक्षेम ईश्वर वहाणार आहेच; पण त्यासाठी आपल्याला ईश्वराचे भक्त बनणे आवश्यक आहे. ईश्वराचा भक्त होण्यासाठी आपण सर्वांनीच साधना करणे  आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते बलोपासना वर्गाच्या वर्षपूर्तीनिमित्त घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ व्याख्यानामध्ये बोलत होते.

वर्ष २०२१ मध्ये श्रीरामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये हिंदूंना स्वरक्षण प्रशिक्षण घेता यावे, यासाठी ‘ऑनलाईन’ बलोपासना वर्ग चालू करण्यात आला होता. श्रीरामाच्या कृपेने हा वर्ग मागील एक वर्षापासून चालू आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने श्रीरामनवमीच्या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचा लाभ ७५० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला, तर सूत्रसंचालन कु. प्राची शिंत्रे यांनी केले. व्याख्यानाचा उद्देश श्री. मिनेश पुजारे यांनी सांगितला, तर श्री. निखील कदम यांनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणून घेतली.

हनुमान जयंतीला वीरता आणि शौर्य यांचे प्रतीक असलेल्या मारुतिरायांच्या गदेचे पूजन करावे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. हर्षद खानविलकर
मारुतिरायांची गदा हे वीरता आणि शौर्य प्रतीक आहे. काळानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना बळ मिळावे, यासाठी मारुतिरायांच्या गदेचे पूजन येत्या हनुमान जयंतीला समस्त हिंदु वीरांनी आपापल्या गावात, तसेच शहरातील मारुति मंदिरांमध्ये करावे.

क्षणचित्रे

१. वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

२. व्याख्यानाच्या समारोपाच्या प्रसंगी धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

मनोगत 

१. सौ. ज्योती जाधव – अधिकाधिक हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू.

२. कु. ऐश्वर्या गावडे – व्याख्यान ऐकतांना पुष्कळ उत्साह जाणवत होता. वातावरणामध्ये थंडावा जाणवला. हिंदूंच्या संघटनासाठी कसे प्रयत्न करू शकतो ? हे लक्षात आले.  त्यानुसार संघटन करण्याचा प्रयत्न करीन.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *