भंडारा – चिनी संस्कृती रुजवण्यासाठी चीनने तिबेटमध्ये प्राथमिक शिक्षणापासून चिनी भाषा शिकवण्याची सक्ती केली आहे. चीनने धर्मगुरु लामा नियुक्त करण्याची परंपरा खंडित केली असून तिबेटीयन संस्कृती जपणारा धर्मगुरु लामा पालटून चिनी संस्कृतीचा लामा आमच्यावर थोपवला आहे. चीन स्वतःची संस्कृती आमच्यावर लादून तिबेटची संस्कृती नष्ट करण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप तिबेटचे निर्वासित राष्ट्रपती पेंपा त्सिरिंग यांनी केला आहे. तिबेटचे निर्वासित राष्ट्रपती पेंपा त्सिरिंग हे १४ एप्रिल या दिवशी येथे आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील विधान केले.
ते पुढे म्हणाले की, परंपरागत येत असलेला लामा या धर्मगुरूंना चीनने पळवले आहे. तिबेटची संस्कृती आणि भाषा जपली नाही, तर तिबेटची ओळख नष्ट होण्याची भीती आहे. संस्कृती टिकवण्यासाठी आमचा संघर्ष चालू असून चीन ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यासाठी आम्ही संघर्ष करत असून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करू. यासाठी आम्ही भारत आणि अमेरिका यांचे साहाय्य मागितले आहे. दोन्ही देश साहाय्य करतील, असा विश्वास आहे.
भारतासमवेत तिबेटचे पारदर्शक संबंध आहेत. त्यामुळे भारताकडून मोठी अपेक्षा आहे. वर्ष २००८ च्या पूर्वी तिबेट येथून भारतात अनुमाने २ सहस्र नागरिक येत होते; मात्र चीनने आवागमनाचे नियम पूर्वीपेक्षा अधिक कठीण केल्याने वर्ष २००८ नंतर २ वर्षांत केवळ २५ व्यक्ती तिबेट येथून भारतात आल्या आहेत. त्यांचीही अधिक माहिती आता मिळत नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. ‘चीन विध्वंसक नीतीने तिबेटची संस्कृती नष्ट करत आहे. तिबेटची संस्कृती भारतात असल्याने तिचे जतन करण्यासाठी भारताने तिबेटला सहकार्य करावे’, अशी भावना राष्ट्रपती पेंपा त्सिरिंग यांनी व्यक्त केली.