हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्यासाठी
प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘गदापूजन’ करण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यात 218 ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमांना संतांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.
#HanumanJayanti
To give strength to the establishment of Hindu Rashtra and awaken valour among Hindus, ‘Gadapujan’ held at 218 places across the nation ! pic.twitter.com/MzALYmuysX— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) April 16, 2022
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर आणि अमरावती; कर्नाटकात बागकोट, धारवाड, शिवमोग्गा, उडुपी, दक्षिण कन्नड, म्हैसूर, तुमकूर, बेंगळुरू आणि बेळगांव; गोव्यात फोंडा आणि साखळी; उत्तर प्रदेशात मधुरा यांसह दिल्ली आणि राजस्थान येथेही सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. या वेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, मारुतीची आरती, मारुती स्तोत्र आणि ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा’ करण्यात आली.
हिंदूंचा इतिहास हा शौर्यशाली आहे. गेल्या ७५ वर्षांत हिंदूंचे शौर्य जागृत होईल, असे कार्यक्रम होतांना दिसत नाहीत. याउलट ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल…’ अशा प्रकारे संदेश देऊन हिंदूंच्या भावी पिढ्यांनाही शौर्यापासून वंचित केले जात आहे. हिंदूंच्या प्रत्येक देवतेचे रुप पाहिले असता, प्रत्येक देवतेचा एक हात आशीर्वाद देणारा, तर अन्य सर्व हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवतेच्या प्रत्येक रुपाचे पूजन हिंदूंनी केले पाहिजे. त्या दृष्टीने देवतांच्या शस्त्रांचेही पूजन केल्यास हिंदूंमध्ये शौर्य जागृत होण्यास साहाय्य होईल. अन्याय अत्याचार यांच्या विरोधात लढण्यासाठी शौर्यच आवश्यक असते. त्यामुळे धार्मिक सणांच्या दिवशी प्रतिकात्मक का होईना, पण शस्त्रपूजन झाले पाहिजे. हिंदूंमध्ये शौर्यजागरण झाले पाहिजे. हिंदूंनी आपल्या सण, उत्सवांच्या माध्यमातून शस्त्रपूजनाच्या परंपरा जपल्या पाहिजेत, अशी या कार्यक्रमामागील भूमिका हिंदु जनजागृती समितीने या वेळी मांडली.