Menu Close

(म्हणे) ‘गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मला दाखवा !’

मुख्यमंत्र्यांच्या धर्मांतरावरील वक्तव्यावरून काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांचा थयथयाट !

  • उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेमध्ये गोव्यात होत असलेल्या धर्मांतराच्या घटनांचा उल्लेख आहे. त्या घटनांविषयी लोबो यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • गोव्याला हिंदूंच्या रक्तरंजित धर्मांतराचा इतिहास आहे. गोमंतकीय हिंदू हा इतिहास विसरलेले नाहीत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

डिलायला लोबो यांच्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होते ! – माहिती कार्यकर्ते अंकित साळगांवकर

गोव्यात धर्मांतर करणाऱ्या ख्रिस्ती पाद्र्यांवर कारवाई व्हायला हवी ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

गोव्याचे मा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात चालू असणाऱ्या धर्मांतर विषयावर चिंता व्यक्त करून सतर्क रहाण्याचे आवाहन करताच भाजपमधून काँग्रेस पक्षात पक्षांतर करणारे आमदार मायकल लोबो यांनी कोणत्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ते दाखवण्याचे आव्हान दिले आहे.

मायकल लोबो यांनी पुष्कळ दूर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या पत्नी ज्या शिवोली मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, त्या मतदारसंघातच ‘बिलिव्हर्स’द्वारे जोरात धर्मांतर चालू आहे. गोव्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अंकित साळगावकर यांनी या संदर्भात तक्रारीदेखील केल्या आहेत; मात्र त्यांच्यावरच खोटे गुन्हे प्रविष्ट करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला गेला.

सांकवाळ येथे विजयदुर्गा मंदिराच्या भूमीत आक्रमण करून ते चर्चद्वारे बळकावण्याचा प्रयत्न चालू आहे, त्या विरोधात लोबो का बोलत नाहीत ? पोर्तुगीज येण्यापूर्वी हिंदु भूमी असणाऱ्या गोव्यात ‘इन्क्विझिशन’द्वारे बळजबरीने हिंदूंना कसे ख्रिस्ती बनवले गेले, त्याचा इतिहास उघड आहे. लोबो यांनी पूर्वजांचा इतिहास शोधल्यास तेथेही हिंदु धर्माचाच संबंध आढळून येईल. असे असतांना ‘गोव्यात धर्मांतर होत नाही’, असे म्हणणे म्हणजे आमिषे दाखवून धर्मांतर करणाऱ्या ख्रिस्ती पाद्र्यांना संरक्षण देणे आहे.

मायकल लोबो

पणजी – गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मुख्यमंत्र्यांनी मला दाखवावे. ते नुसतेच हवेत बाण मारत आहेत, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात ‘गोव्यातील निरनिराळ्या भागांत धर्मांतर करण्यासाठी लोक पुढे सरसावत आहेत’, असे विधान केले होते. कदाचित् त्यांना जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, गोव्यात कुठेही धर्मांतर झालेले नाही. ‘चर्चमध्ये धर्मांतर होते’, असे त्यांनी दाखवल्यास मी त्यांच्या समवेत जाईन. त्यांच्या पक्षश्रेष्ठींना प्रसन्न करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी असे विधान केले आहे. त्यांनी गोव्यातील जनतेमध्ये अस्थिरता निर्माण केली आहे.’’ याच विषयावरून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचे गोव्यातील अध्यक्ष शेख अब्दुल रौफ यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री गरिबी, इंधन दरवाढ आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठी धर्मपरिवर्तनाचे सूत्र पुढे आणत आहेत.’’

मायकल लोबो यांची पत्नी आमदार असलेल्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होत आहे ! – हिंदुत्वनिष्ठ अंकित साळगांवकर

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या अंकित साळगावकर यांचे अभिनंदन !

मायकल लोबो यांच्या ‘गोव्यात धर्मांतर होत नाही’ या विधानाला विरोध करतांना शिवोली येथील हिंदुत्वनिष्ठ अंकित साळगांवकर यांनी ‘मायकल लोबो यांची पत्नी निवडून आलेल्या शिवोली मतदारसंघातच शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाइव्ह पिलर्स’ स्थानातून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे’, असे म्हटले आहे.

याविषयी अंकित साळगांवकर यांनी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट केली आहे. धर्मांतराविषयी ते म्हणाले, ‘‘गोव्यात शिवोली, मडगाव इत्यादी अनेक भागांत धर्मांतर केले जात आहे. वर्ष २०१८ मध्ये गोव्यात होणाऱ्या धर्मांतराचा विरोध करण्यासाठी आम्ही पणजी येथे मोठा मोर्चा काढला होता. मायकल लोबो यांना धर्मांतर होत असल्याचे ठाऊक नाही का ? त्यांची पत्नी निवडून आलेल्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होत आहे. शिवोली भागात धर्मांतर होते, याविषयी आम्ही पोलिसांच्या विशेष शाखेला यांसंबधी पत्र दिलेले आहे. मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांना विचारण्यापेक्षा हणजुणे पोलीस ठाणे किंवा पोलिसांच्या विशेष शाखेकडे याविषयी चौकशी करावी. त्यांना ठाऊक नसेल, तर ते पत्र मी त्यांना देऊ शकतो. सध्या भाजप गोव्यात पुष्कळ चांगले कार्य करत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही चांगले कार्य करत आहेत. त्यामुळे भाजपमधून बाहेर पडलेले मायकल लोबो निराशेपोटी असे बोलत आहेत. इथे धर्मांतर होत आहे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. आम्ही हिंदूंनी प्रयत्न केल्यामुळे शिवोली येथील धर्मांतराचे  प्रमाण अल्प झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उचललेले पाऊल योग्य आहे आणि त्यांनी लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *