Menu Close

शंभूराजांना हाल हाल करून मारणाऱ्या ‘औरंगजेबा’चे नाव हटवण्यासाठी लोकशाही मार्गाने चालू केलेली मोहीम आहे ! – सूरज आगे, प्रमुख, शिवप्रहार प्रतिष्ठान

वैजापुरातील ‘शिवप्रहार’च्या शंभू मेळाव्यात ‘संभाजीनगर’ नामकरण करण्यासाठी सहस्रो तरुणांचा निर्धार !

मेळाव्यात सहस्रो तरुणांना मार्गदर्शन करतांना सुरज आगे

वैजापूर (संभाजीनगर) – औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण कायदेशीर करायचे असेल, तर लोकशाही मार्गाने कुठलाही कायदा हातात न घेता सर्व तालुक्यांमध्ये मेळावे घ्यावे लागतील, तसेच आंदोलने करावी लागतील. तेव्हाच सर्व सरकारी कार्यालये आणि कागदपत्रे यांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव मोठ्या दिमाखात झळकेल. शंभूराजांना हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाचे नाव हटवण्यासाठी बिगर राजकीय आणि लोकशाही मार्गाने चालू केलेली ही मोहीम आहे, असे परखड विचार ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’चे प्रमुख अन् माजी पोलीस अधिकारी सूरज आगे यांनी मांडले. शिवप्रहार प्रतिष्ठान आणि शिवशंभूभक्त परिवार यांच्या वतीने ‘संभाजीनगर’ नामकरणासाठी आयोजित केलेला ‘शंभू मेळावा-१’ हा कार्यक्रम वैजापूर शहरातील द्रौपदी लॉन्स येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

मेळाव्यात सहस्रो तरुणांना मार्गदर्शन करतांना सुरज आगे

सूरज आगे पुढे म्हणाले, ‘‘आपण औरंगजेबाचे नाव हटवत आहोत. राष्ट्रभक्त ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव हटवण्यासाठी ही मोहीम काढलेली नाही. ‘संभाजीनगर नामकरण मोहिमे’चे पुढचे असेच बुलंद पाऊल ‘शंभू मेळावा-२’ च्या रूपाने पडणार असून १२ जून २०२२ या दिवशी हा कार्यक्रम संभाजीनगर शहराजवळ आयोजित केला जाईल. वैजापूर तालुक्याप्रमाणे इतरही तालुक्यातील अठरा पगड जातीचा शिवशंभूभक्त-मावळा जागा झाला, तर अवघ्या महाराष्ट्राचे स्वप्न असलेले ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ हे लवकरच पूर्णत्वास आलेले दिसेल.’’

या कार्यक्रमाला वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, नगराध्यक्ष दिनेशभाऊ परदेशी यांच्यासह वेगवेगळे पक्ष आणि संघटना यांचे शिवशंभूभक्तही उपस्थित होते.

‘शिवप्रहार प्रतिष्ठान’च्या मावळ्यांचे कठोर कष्ट !

सूरज आगे यांच्यासह ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’च्या मावळ्यांनी वैजापूर तालुका, गाव, वाड्या आणि वस्त्या पिंजून काढत ६७ बैठका घेतल्या. रात्रंदिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अठरापगड जातींच्या विचारांसह ‘संभाजीनगर नामकरण मोहिमे’साठी रक्ताचे पाणी करून निःस्वार्थपणे कष्ट घेतले. याला वैजापूर येथील जनतेने शुभाशीर्वादासह मनापासून साथ दिली. संपूर्ण जिल्ह्यात कष्टाचे काम असेच राजकारणविरहीत चालू रहाणार आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *