कोरुटला (तेलंगाणा) येथे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
भाग्यनगर (तेलंगाणा) – सध्या प्रत्येक जण पैसे मिळवण्याच्या मागे लागला आहे. आपल्यासाठी हा पैसा आणि शरीर शाश्वत नाही. तो कधी निघून जाईल, हे आपणही सांगू शकत नाही. त्यामुळे शाश्वत धर्माचे पालन करून आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे. सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नंदीपेट ग्राम येथील श्रीश्रीश्री मंगी रामुलु महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोरुटला येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. त्या वेळी ते संबोधित करत होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा समन्वयक श्री. चेतन जनार्दन आणि सनातन संस्थेच्या सौ. विनुता शेट्टी यांनीही संबोधित केले. समितीचा परिचय इंदूर जिल्हा समन्वयक श्री. नेला तुकाराम यांनी करून दिला. या सभेला ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
स्वत: धर्माचरण करून आपल्या मुलांनाही धर्मशिक्षण द्या ! – सौ. विनुता शेट्टी, सनातन संस्था
आजच्या धर्मनिरपेक्ष भारतामध्ये महिला असुरक्षित आहेत. एका सर्वेक्षणानुसार वर्ष २०२१ मध्ये महिलांशी संबंधित ३१ सहस्र तक्रारी नोंदवण्यात आल्या. नोंद न झालेल्या घटनांची संख्या याहून पुष्कळ अधिक आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आईवडिलांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघालेली मुलगी घरी सुखरूप परत येईल कि नाही, याची भीती असते. यासाठी आपण सर्वांनी धर्माचरण करून आपल्या मुलांनाही धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
हिंदूंची स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक ! – चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
देशात सरकारी अनुदान प्राप्त शिक्षण संस्थांमध्ये हिंदु धर्माचे शिक्षण देता येत नाही. तेथे कुराण आणि बायबल शिकवता येऊ शकते; पण भगवद्गीता आणि हिंदूंचे अन्य धर्मग्रंथ यांचे शिक्षण देता येत नाही. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे.
क्षणचित्रे :१. सभेनंतर झालेल्या बैठकीमध्ये एका धर्मप्रेमी महिलेने सांगितले की, समितीचे कार्यकर्ते धर्माची माहिती देतात. त्याचप्रमाणे स्वत:ही आचरण करतात. त्यांची स्वागत करण्याची पद्धती अतिशय चांगली होती. २. ‘सिटी केबल’ या वाहिनीच्या प्रतिनिधीने संपूर्ण सभेचे चित्रीकरण केले. या वेळी त्याने ‘कोरुटलामध्ये यापूर्वी असा कार्यक्रम कधी झाला नाही’, असे म्हटले. ३. एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती’ या विषयावर प्रवचन ठेवण्याची इच्छा प्रदर्शित केली. ४. सभेमध्ये गावातील पुरोहित मंडळाच्या वतीने मुली आणि महिला यांना मंदिरात प्रवेश करतांना हिंदु संस्कृतीचे आचरण करण्याची शपथ देण्यात आली. ५. सभेनंतर झालेल्या बैठकीमध्ये अनेक धर्मप्रेमींनी धर्मकार्यासाठी वेळ देण्याची सिद्धता दर्शवली. |