अमरावती येथील ‘श्री रामदेव बाबा जम्मा जागरण’ कार्यक्रम
अमरावती (वार्ता.) – पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षापद्धत आणि एकत्र कुटुंबपद्धत होती. त्यातून धर्मशिक्षण मिळत असे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमानही वृद्धींगत होत असे; पण आता धर्मशिक्षणच मिळत नाही आणि मुलेही कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण घेतात. त्यांना घरी किंवा मंदिरे येथेही धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्यात धर्माविषयी अज्ञान असते. त्यामुळे समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी कृतीशील झाले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. कांचन शर्मा यांनी केले. स्थानिक राजापेठ येथील श्री रामदेवजी महाराज संस्थानच्या वतीने आयोजित ‘श्री रामदेव बाबा जम्मा जागरण’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
दर्यापूर येथील धर्माभिमानी आणि श्री रामदेव बाबा जन्म जागरण कार्यक्रमाचे प्रवचनकार श्री. नवल मालपाणी यांनी हिंदु जनजागृती समितीला विषय मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. या वेळी श्री. मालपाणी यांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत असलेल्या धर्मकार्याचे कौतुक केले. उपस्थित सर्वांना या धर्मकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित भाविकांनी व्याख्यान आणि प्रदर्शन यांचा लाभ घेतला.