Menu Close

‘विजयदुर्ग’ आणि ‘लोकमान्य टिळकांचे स्मारक’ यांचे संवर्धन व्हावे !

लांजा तालुका वारकरी मंडळाची रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन देतांना डावीकडून ह.भ.प. गोविंदबुवा चव्हाण, ह.भ.प. चंद्रकांत पवार, ह.भ.प. मनोहर (दादा) रणदिवे, ह.भ.प. प्रकाश कुंभार आणि ह.भ.प. विष्णु लांजेकर

रत्नागिरी – छत्रपती शिवरायांच्या दुर्गबांधणीच्या तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘विजयदुर्ग’, तसेच ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असा ज्यांचा गौरव केला जातो, त्या लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान असलेले रत्नागिरीतील स्मारक यांची दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभाग आणि शासन यांनी तातडीने त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी लांजा तालुका वारकरी मंडळाकडून २ स्वतंत्र निवेदनांद्वारे रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे अलीकडेच करण्यात आली आहे.

ही निवेदने रत्नागिरी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना देण्यात आली. या वेळी ह.भ.प. दादा रणदिवे, ह.भ.प. गोविंदबुवा चव्हाण, ह.भ.प. चंद्रकांत पवार, ह.भ.प. प्रकाश कुंभार, ह.भ.प. विष्णु लांजेकर, ह.भ.प. मनोहर शिंदे, ह.भ.प. रमेश घुमे, ह.भ.प. सचिन माटल, ह.भ.प. प्रकाश जाधव आदी वारकरी उपस्थित होते.

एका निवेदनात म्हटले आहे की,

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये गड-दुर्गांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. छत्रपती शिवरायांनी सागरी मार्गानी होणारी आक्रमणे मोडून काढण्यासाठी स्वतःचे आरमार आणि जलदुर्गांचीही निर्मिती केली. या आरमाराच्या माध्यमातून इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज आदी परकीय आक्रमकांचा बिमोड करत स्वराज्याचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या दुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग ! दुर्दैवाने आज या दुर्गाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या दुर्गाची तटबंदी, बुरुज यांसह ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था झाली आहे. गडावर भगवा ध्वज उभारण्यास अटकाव होत असून छत्रपती शिवरायांचे आराध्यदैवत श्री भवानीमातेची मूर्ती मंदिराविना उघड्यावर आहे. या दुर्गाची दुरवस्था झालेल्या ठिकाणांची दुरुस्ती, संवर्धन आणि देखभाल यांसाठी तातडीने शासकीय निधी उपलब्ध करून तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हे काम आरंभण्यात यावे.

दुसर्‍या निवेदनात म्हटले आहे की,

भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले, गणेशोत्सव, शिवजयंती यांसारख्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला गतीमान करणारे लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरी येथील जन्मस्थानाची झालेली दुरवस्था अशोभनीय आहे. सदर स्मारक हे महाराष्ट्र राज्य संरक्षित असून राज्याच्या पुरातत्व विभाग रत्नागिरीच्या अंतर्गत येते. हे स्मारक पहाण्यासाठी देशभरातून शेकडो नागरिक, विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. जन्मस्थान स्मारकाच्या वास्तूच्या छपराची कौले फुटली आहेत, त्यावरील पत्रा गंजला आहे. वास्तूचा रंग अनेक ठिकाणी उडाला आहे. लोकमान्य टिळकांचा पुतळा, मेघडंबरीचे छत खराब होत चालले असून लोकमान्य टिळकांच्या जीवनातील प्रसंग चितारलेली शिल्पाकृती तुटून पडली आहे. लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संरक्षण आणि संवर्धन करण्यात यावे आणि ते ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे.

Tags : Save Forts

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *