Menu Close

सावरकरांना नकली देशभक्त संबोधून त्यांच्यावर टीका करणे, ही नीचपणाची हद्द !

क्रांतीकारकांची हेटाळणी करणारा जगातील एकमेव देश भारत !

satchidanand_shevde
डॉ. सच्चिदानंद शेवडे

चंद्रशेखर आझाद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन थोर क्रांतीकारकांची तुलना करून एकाला असली आणि दुसर्‍याला नकली ठरवण्याचा अधिकार काँग्रेसला दिला कुणी ? ना गुणी गुणिनं वेत्ति, अर्थात् गुणवान लोकांना गुण नसलेले लोक पाण्यात बघतात, अशी अवस्था सांप्रतकाळात काँग्रेसची झालेली दिसते. अर्थात् त्यांना दोष तरी का द्यावा ? कारण राहुल गांधींच्या पणजोबांनी सावरकरांना गांधी हत्येच्या आरोपात अडकवून कारागृहाची हवा खायला लावली होती. तेव्हापासूनच गांधी घराण्याने सावरकरद्वेषाची परंपरा जोपासली आहे. पुढे सावरकर निर्दोष सुटल्यावर वर्ष १९५० मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानाला म्हणजे लिलायत अली याला खुश करण्यासाठी सावरकरांना अटक करून बेळगावच्या हिंडलगा कारागृहात १०० दिवस डांबण्यात आले होते. जगातील कोणत्याही देशाने आपल्या क्रांतीवीरांची अशी हेटाळणी केली नसेल.

पूर्ण वस्तुस्थिती जाणून न घेता केवळ अर्धसत्य मांडणारे सावरकरद्वेषी काँग्रेसी नेते !

swatantravir_savarkarज्यांना सुटकेची मागणी आणि क्षमा यातील फरक जाणून घ्यायचा नाही, अशा लोकांना समजावून काहीच उपयोग नाही. तथापि यांनी सातत्याने जो अपप्रचार चालवला आहे त्याला उत्तर द्यायला हवे. काँग्रेसने सतत सशस्त्र क्रांतीकारकांचा तिरस्कार आणि पूर्ण वाताहत झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची उपेक्षा केली. या लोकांचे एकमात्र ध्येय सत्ता हेच होते आणि तेच गेल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत, इतकेच यातून सिद्ध होते. त्यामुळे सतत अर्धसत्य मांडत रहायचे आणि देशभक्ताला लोकांच्या दृष्टीतून उतरवण्याचा प्रयत्न करायचा, एवढेच कार्य ते करत आहेत. सावरकरांनी एकवेळा नव्हे, तर अनेकवेळा सुटकेची भीक मागीतली, ते क्षमावीर होते यासारखा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जातो आहे. त्यांची ती पत्रे कोणी दाखवतच नाहीत, केवळ आरोप करून स्वत:चेच हसे करून घेत आहेत. सावरकरांनी स्वत:ची, तसेच अन्य बंदीवानांची सुटका करावी, असे पत्र लिहिले, एवढेच सत्य आहे. त्या पत्रात सावरकरांनी, मला सोडणे कठीण वाटत असेल, तर अन्य राजबंद्यांची सुटका करा, असे म्हटले होते. याला क्षमापत्र म्हणतात काय ? ज्या वेळी त्यांनी तसे पत्र लिहिले, त्याच काळात इंग्रजांनी आयरिश बंडखोरांची सुटका केली होती. तोच न्याय भारतातील बंदिवानांना लावला जावा, हा त्यांचा युक्तीवाद होता. ते अधिवक्ता होते; म्हणून त्यांना ब्रिटीश कायद्याचे उत्तम ज्ञान होते. अशा वेळी जर भारतीय राजकीय बंदी सुटले असते, तर ते देशहिताचेच ठरले असते. अशा प्रयत्नांना दयेची भीक मागणे म्हणणे हा कृतघ्नपणाच आहे. गांधी कारावासात असतांना त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि दुसर्‍या गोलमेज परिषदेत सामील होण्याच्या अटी मान्य केल्यावरच त्यांची सुटका झाली. या कृतीला काँग्रेसवाले काय म्हणणार आहेत ? पुढे वर्ष १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करार झाला. भगतसिंह-राजगुरु-सुखदेव या तरुणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा काँग्रेस आणि गांधींनी नेमके काय केले ? बाबाराव सावरकर स्वत: गांधींची भेट घ्यायला गेले होते. त्यांनी आयर्विनसोबतच्या करारात त्या तिघांची फाशी टळावी, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यावर, ते हिंसाचारी आहेत आणि समोरचा जेवढे देईल तेवढे घेण्याची आपली भूमिका असल्याचे गांधींनी सांगितले. वर्ष १९४२ च्या चळवळीत आत गेलेले काँग्रेसी नेते कसे सुटले हे काँग्रेसी नेत्यांनी एकदा वाचावे आणि मगच आरोप करावेत.

सावरकर आणि आझाद यांच्या संबंधात पुरोगामी, समाजवादी आणि गांधीवादी असलेले य.दि. फडके हे त्यांच्या शोध सावरकरांचा या पुस्तकात काय म्हणतात ते पहा,

१. १९२९-१९३० या काळात सावरकरांनी श्रद्धानंदमध्ये निनावी लेखन करून आझादांच्या साहसामुळे स्फूर्ती मिळालेल्या तरुणांच्या मनात अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला. (पृ.११५)

२. आझादांच्या सोबत बाबाराव सावरकर यांच्या बैठका झाल्या होत्या. (पृ.११७)

३. आझादांचे सहकारी भगतसिंह यांनी छापलेल्या सावरकर लिखीत पुस्तकांच्या प्रती बाबाराव सावरकरांच्या घरात झडतीत सापडल्या. (पृ.११८)

४. आझाद आणि भगतसिंह यांच्या गटाशी वरील संबंधाची कुणकुण लागल्याने वीर सावरकरांवरील निर्बंधांना मुदतवाढ देण्यात आली आहे. (पृ.११९)

५. पोलिसांना सावरकरांच्या घरावर आझादांचे सहकारी भगतसिंह यांच्या फाशीची वार्ता आल्यानंतर भगव्याऐवजी काळा झेंडा दिसला आणि सावरकरांच्या अनुयायांनी सावरकरांनी लिहिलेली कविता म्हणत प्रभातफेरी काढली. (पृ.१२४)

अर्थात असे अनेक पुरावे आमच्या क्रांतिकारक राजगुरु या चरित्रकहाणीत आहेत. ते मुद्दामच न देता पुरोगामी असलेल्या फडके यांचे पुरावे दिले आहेत.

सत्तेत असतांना सावरकरांचा आदर करणारी आणि सत्ता गेल्यानंतर सावरकरांवर टीका करणारी काँग्रेस !

काँग्रेसवाले विसरले असले, तर स्मरण करून देतो. इंदिरा गांधींनी मुंबईत उभ्या रहात असलेल्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठी आपल्या वैयक्तिक खात्यातून ५ सहस्र रुपये देणगी म्हणून दिले होते. नंतर भारत शासनाने सावरकरांचे टपाल तिकीटसुद्धा काढले होते. तेव्हा सत्ता काँग्रेसची होती. आता सत्ता आणि पदे गेल्यामुळे काँग्रेसवाले आणि साम्यवादी नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे ते आपली वैचारिक दिवाळखोरी सर्वांना दाखवून देत आहेत. त्यामुळे जनमानसांतील त्यांची प्रतिमा अधिक मलीन होत आहे. सावरकरांना कोण्या एका जातीचा नव्हे, तर सर्वांचा पाठिंबा आहे, हे बहुधा त्यांच्या लक्षात येत नाही.

द वीक या साप्ताहिकामध्ये असाच हीन लेख मध्यंतरी निरंजन टकले नामक महाभागाने लिहिला होता. त्याने तर प्रचंड अभ्यास केल्याचा आव आणला होता. प्रत्यक्षात मात्र फुसका बार निघाला. तेच तेच घिसपिटे आरोप करणे आणि त्याला प्रत्युत्तर आले की, पळून जाणे हा त्यांचा बाणा संकेतस्थळावर दिसला.

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार (संदर्भ : दैनिक तरुण भारत, २० मार्च २०१६)

भारतीय राजकारणात उत्प्रेरकासारखे कार्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

अखेरीस सावरकर अभ्यासक असलेले चंद्रशेखर साने या आमच्या स्नेह्याने केलेले अचूक विश्‍लेषण देतो. ते लिहितात, सावरकर हे भारतीय राजकारणात रसायनशास्त्रातल्या उत्प्रेरकासारखे आहेत. उत्प्रेरकाचा रासायनिक प्रक्रियेत सहभाग नसतो तसाच रासायनिक घडामोडींचा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही; पण प्रक्रिया घडवून आणण्यात मात्र तो साहाय्यकारी ठरतो. उत्प्रेरक एकतर रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवतो किंवा मंद करतो; पण स्वत: मात्र निर्लेप रहातो. सावरकरांचे विचार हे प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होतांना दिसत नाहीत. त्यांचे नावही देशात सरसकट सर्वांना माहीत नाही. १०० हून अधिक वर्षे त्यांच्या नावाचा आणि विचारसरणीचा विरोध, द्वेष आणि गैरसमज करणे चालू आहे; पण सावरकरांचे नाव मिटवणे विरोधकांना शक्य झाले नाही. उत्प्रेरक म्हणून भारतीय राजकारणात असलेले सावरकरांचे अस्तित्व अढळ आहे. यावर अधिक भाष्याची आवश्यकता नाही…!!

(संदर्भ : दैनिक तरुण भारत, २० मार्च २०१६)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *