हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड-बंगाल येथे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन
धनबाद (झारखंड) – भारताला हिंदु राष्ट्र करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांना संघटित झाले पाहिजे. ‘तरुण हिंदू’ या संघटनेची स्थापना याच उद्देशाने झाली आहे. त्यामुळे आम्ही हिंदु जनजागृती समितीसह एकत्रित कार्य करत आहोत, असे प्रतिपादन ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले.
‘भारतात पुन्हा एकदा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, असा संकल्प घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ एप्रिल या दिवशी धनबाद येथील स्टील गेट स्थित नेहरू सांस्कृतिक केंद्रामध्ये ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये झारखंड आणि बंगाल राज्यातील १६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्र यांनी अधिवेशनाला प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. या अधिवेशनाला सेवाश्रम संघ, धनबादचे स्वामी प्रयागत्मानंदजी महाराज; ‘इस्कॉन, बंगाल’चे स्वामी रामानंदजी महाराज, धनबादचे स्वामी दामोदरजी महाराज आणि लोचन मिश्राजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित कार्य केले पाहिजे ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे. राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी धर्माच्या बाजूने रहाणे, हे आपल्या सर्वांचे सामूहिक दायित्व आहे. वर्ष २०२३ नंतर सत्त्वगुणी हिंदूंकडून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. त्यामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन संघटितपणे कार्य केले पाहिजे.
* केवळ भारतच विश्वकल्याणाचा विचार करतो ! – लोचन मिश्राजी महाराज
केवळ भारतातच नाही, तर अखिल विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे; कारण केवळ हिंदु धर्मच अखिल विश्व कल्याण आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) विचार करतो.
क्षणचित्रे :
१. अधिवेशनामध्ये गटचर्चा करण्यात आली. त्यामध्ये येणाऱ्या काळात गाव आणि जिल्हा स्तरावर हिंदु राष्ट्र-जागृती सभा, हिंदु जागृती बैठका यांचे अधिकाधिक आयोजन करणे, तसेच सर्वांसाठी धर्मशिक्षण वर्गांचे आयोजन करण्याचे ठरले.
२. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून करण्यात येत असलेल्या संशोधन कार्याची माहिती कु. आद्या सिंह हिने सांगितली.
३. बंगालमधील संत स्वामी रामानंद महाराज म्हणाले, ‘‘नेहमी आम्ही बोलतो आणि लोक ऐकतात. आज मी केवळ ऐकण्यासाठी आलो आहे, तर पूर्णवेळ ऐकेन.’’
४. अधिवेशनाच्या ठिकाणी काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. ते पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ‘असे प्रदर्शन आम्ही आमच्या भागात लावू’, असे सांगितले.
५. अधिवेशनाच्या ठिकाणी ‘पश्चिम बंगेर जन्य’ या संघटनेने बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे प्रदर्शन लावले होते.
६. अधिवेशनामध्ये आरमबाग, हुगळी, हजारीबाग आदी ठिकाणांहून हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.