Menu Close

राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी सर्वांनी धर्माच्या बाजूने राहिले पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ

लक्ष्मणुरी (उत्तरप्रदेश) – राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी धर्माच्या बाजूने राहणे, हे आपले सर्वांचे सामूहिक दायित्त्व आहे. वर्ष २०२५ मध्ये सत्त्वगुणी हिंदूंकडून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कैसरबाग स्थित गांधी भवनमध्ये ‘राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये रायबरेली, लक्ष्मणपुरी, गोरखपूर, जालौन आणि देवरिया या भागातील हिंदु पर्सनल लॉ बोर्ड, भगवा रक्षा वाहिनी, राष्ट्रीय भगवा युवा संघ, हिंदु जनसेवा समिती, विश्व हिंदु दल, जनउद्घोष सेवा संस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था अशा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनेक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि अधिवक्ते सहभागी झाले होते. शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्र यांच्या चैतन्यमय वातावरणामध्ये अधिवेशनाचा आरंभ झाला.

डावीकडे पू. नीलेश सिंगबाळ आणि दीपप्रज्वलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

अधिवेशनामध्ये हिंदुत्वनिष्ठांनी केलेले उद्बोधन

जातीभेद संपवून सर्वांनी संघटित होणे आवश्यक ! – अधिवक्ता शेषनारायण पांडे, गोरखपूर

एकीकडे शासनकर्ते म्हणतात की, आम्हाला जातीभेद नको आणि त्याच जातीपातीच्या आधारावर तथाकथित अल्पसंख्यांकांना आरक्षणही दिले जात आहे. हा जातीभेद नाही, तर काय आहे ? त्यामुळे जातीभेद संपवून सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तळागाळापर्यंत कार्य करणे आवश्यक !- कुलदीप तिवारी, राष्ट्रीय अध्यक्ष, जनउद्घोष सेवा संस्था

आज भारतात एक सबळ सरकार असतांनाही जर आम्ही हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी काही करू शकत नसेल, तर तो आमचा फार मोठा कमकुवतपणा आहे; कारण अद्यापही आपण सर्वजण हिंदूंपर्यंत धर्मशिक्षण पोचवू शकलो नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तळागाळापर्यंत कार्य करण्याची आवश्यकता आहे.

या वेळी हिंदु पर्सनल लॉ बोर्डाचे संस्थापक अधिवक्ता अशोक पांडे म्हणाले की, देश धर्मनिरपेक्ष असतांनाही भारतात दोन कायदे का आहेत ? यासाठी सर्वांनी जागृत होऊन प्रयत्न केले पाहिजेत.

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

अधिवेशनाच्या ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतांना हिंदुत्वनिष्ठ
१. अधिवेशनाच्या ठिकाणी काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

२. गोरखपूर येथील ३ अधिवक्ते रात्रभर प्रवास करून आणि रेल्वेस्थानकावर अंघोळ करून या अधिवेशनात सहभागी झाले.

३. भोजन वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, ‘आम्ही अनेक कार्यक्रम केले; पण कुणीही ताटामध्ये अन्न वाया घालवले नाही, हे प्रथमच पाहिले आहे.’

४. धर्मप्रेमी मनीष पांडे हे देवरिया जिल्ह्यातून ३२५ किलोमीटर प्रवास करून अधिवेशनाला आले होते. तरीही त्यांनी सकाळी ६ ते साडेआठपर्यंत अधिवेशनाची पूर्वसिद्धता करून  अधिवेशनामध्ये सहभागी झाले.

५. श्री. शैलेंद्रसिंह हे जालौन येथून ५५० किलोमीटरचा प्रवास करून अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. ते अधिवेशनाच्या नंतरच्या सेवांमध्ये सहभागी झाले.

६. या अधिवेशनाला आलेल्या पत्रकारांनी स्वत:हून अन्य वृत्तपत्रांच्या पत्रकारांना संपर्क करून या अधिवेशनाची बातमी घेण्याविषयी सांगितले. त्यामुळे या अधिवेशनाचे वृत्त ५ राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *