Menu Close

पत्नी आणि मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी छोट्या ध्वनीक्षेपकावर गाणे लावण्यामुळे गुन्हा नोंद करणे हे षड्यंत्रच ! – किशोर मलकुनाईक, पोलीस उपनिरीक्षक

संभाजीनगर येथे अजानच्या वेळी पोलीस उपनिरीक्षकांनी गाणे लावल्याचे प्रकरण

संभाजीनगर – येथील सातारा परिसरात रहाणारे आणि सध्या परळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले किशोर मलकुनाईक यांनी अजानच्या वेळी स्वतःच्या घरात मोठ्या आवाजात गाणे लावले, अशा तक्रारी काही मुसलमानांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडे केल्या होत्या. त्याची नोंद घेत सातारा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी स्वत: तक्रारदार होऊन मलकुनाईक यांच्यावर २४ एप्रिल या दिवशी गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे किशोर मलकुनाईक हे कमालीचे अप्रसन्न झाले आहेत. त्यांनी ‘पत्नी आणि मुलगा यांच्या वाढदिवसाच्या एकत्रित कार्यक्रमात घरात ध्वनीक्षेपक लावला म्हणून माझ्यावर गुन्हा नोंद होतो, हे न पटणारे आहे. यामागे नक्कीच काहीतरी षड्यंत्र आहे’, अशी शंका व्यक्त केली आहे.

१. किशोर मलकुनाईक हे ज्या इमारतीत रहातात, त्याच्या समोरच एक मशीदही आहे. २३ एप्रिल या दिवशी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त मलकुनाईक यांनी घरात मेजवानीचे आयोजन केले होते.

२. सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांनी लगेचच स्वत:च्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. सिल्क मिल कॉलनी येथील गल्ली क्रमांक २, सफा मशिदीजवळ पोलीस आले असता नियंत्रण कक्षाला दूरभाष करणारे वरील मुसलमानांसह इतर मुसलमानही तेथे उपस्थित होते.

३. किशोर मलकुनाईक म्हणाले, ‘‘२२ एप्रिल या दिवशी माझ्या मुलाचा आणि २३ एप्रिल या दिवशी पत्नीचा वाढदिवस होता. दोघांचा वाढदिवस २३ एप्रिल या दिवशी एकत्रित  साजरा केला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या माझ्या फ्लॅटच्या खिडकीबाहेर रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडे मशीद आहे. भ्रमणभाषचे ‘ब्ल्यूटूथ’ जोडून आम्ही त्यावर वाढदिवसाचे गाणे लावले. एका छोट्या ध्वनीक्षेपकाचा आवाज किती मोठा असेल ? याची कल्पना करा; पण तरीही कुणीतरी पोलीस मुख्यालयात दूरभाष करून मशिदीच्या समोर मोठ्या आवाजात गाणे लावल्याची तक्रार केली. त्याच रात्री ८.३० वाजता पोलीस आले. त्यांनी ‘तुमच्या विरोधात तक्रार आहे,’ असे म्हणून माझा आणि पत्नीचा जबाब घेतला.  दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ एप्रिलच्या रात्री ८.३० वाजता माझ्यावर गुन्हा नोंद झाल्याचे कळले, तेव्हा पुष्कळ वाईट वाटले. इतक्या दिवसांपासून मी या ठिकाणी रहातो, आमच्या आजूबाजूला मुसलमान रहातात. आमच्यात कधीच कुठल्या कारणामुळे वाद झालेले नाहीत. चौकशीसाठी पोलिसांनी मी आणि पत्नी यांना रात्री विलंबापर्यंत पोलीस ठाण्यात बसवले. रात्री १ वाजता सोडले. पुष्कळ मनस्ताप झाला.’’ (कोणताही गुन्हा केलेला नसतांनाही एक पोलीस अधिकारी आणि त्याची पत्नी यांना पोलिसांकडून असा त्रास दिला जात असेल, तर तेथे जाणाऱ्या सर्वसामान्य माणसांना किती त्रास होत असेल ? याचा विचारच न केलेला बरा. – संपादक दैनिक सनातन प्रभात)

न्यायालयातून जामिनाची तरतूद, ३ वर्षांपर्यंत शिक्षा शक्य !

रेल्वेत पोलीस उपनिरीक्षक या पदावर असतांनाही किशोर मलकुनाईक यांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केले. २ समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे, अफवा पसरवणे आणि नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होईल असे वर्तन केल्याप्रकरणी (भारतीय दंड विधान संहिता कलम ५०५ (१)(ब), ५०५ (१)(क) भादंवी, १३५ महाराष्ट्र  पोलीस अधिनियम) त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या कलमानुसार आरोप निश्चिती झाल्यास ३ वर्षांपर्यंत शिक्षा किंवा आर्थिक दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात, असे अधिवक्ता सुदर्शन साळुंके आणि अधिवक्ता अशोक ठाकरे यांनी सांगितले. मलकुनाईक यांना या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जामीन घ्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *