मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती
मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) – सध्या हिंदूंसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या जिहादांचे संकट आहे. धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात आहे. अशा सर्व संकटांवर हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी हिंदूंनी धर्मासाठी वेळ देऊन एकत्र यायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी २५ एप्रिल या दिवशी केले. ते मत्तिवडे गावातील श्री नृसिंह मंदिरात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेसाठी माजी सैनिक श्री. मनोहर पाटील यांच्यासह २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी सनातन संस्थेच्या सौ. विजया वेसणेकर म्हणाल्या, ‘‘शरीर आणि मन सुदृढ तसेच आनंदी रहाण्यासाठी आपण प्रयत्न करतो त्याप्रमाणे आपला आत्मा सुदृढ आणि आनंदी रहावा यासाठी भगवत् भक्ती म्हणजे साधना करणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे आचार-विचार पोशाख परिधान करण्यापेक्षा आपल्या महान संस्कृतीचे आचरण करा.’’
सभेच्या प्रारंभी श्री. आदित्य शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. श्री. राहुल खाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. आदित्य शास्त्री, तर आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ. शालन चव्हाण यांनी सौ. विजया वेसनणेकर यांचा सत्कार केला. श्री नृसिंह मंदिरातील विश्वस्त श्री. शिवगौंडा पाटील यांनी सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिले, तसेच गावातील अनेकांनी साहित्य उपलब्ध करून दिले. याविषयी समितीने त्यांचे आभार मानले.
विशेष
१. धर्मप्रेमी सर्वश्री नवनाथ पाटील, चेतन चव्हाण, दशरथ डोंगळे, संतोष जाधव यांनी पुढाकार घेऊन सभेपूर्वी ३ बैठकांचे आयोजन करून गावातील प्रत्येक भागात प्रसार केला. हे धर्मप्रेमी सभेची अनुमती काढण्यापासून प्रत्येक सेवेत सहभागी होते, तसेच यांनी पुढाकार घेऊन संघटितपणे सेवा केली.
२. धर्मशिक्षणवर्गातील सौ. राधिका शहाजी चव्हाण, सौ. राधिका चेतन चव्हाण, सौ. माया पोटले, सौ. वासंती चव्हाण, सौ. पद्मावती जाधव यांनी सभेच्यापूर्वी घरोघरी जाऊन गावातील महिलांना सभेचे निमंत्रण दिले.
३. सरपंच सौ. शालन चव्हाण यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत कक्षावर सेवा केली.
क्षणचित्रे
१. नांगनूर येथील धर्मप्रेमी सभेसाठी उपस्थित होते.
२. सभा झाल्यावर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
३. सर्वश्री अर्जुन केसरकर, राहुल खाडे, उदय खाडे, धनाजी चव्हाण, सर्जेराव चव्हाण, उमेश मोरे यांचा सेवेत उत्स्फूर्त सहभाग लाभला.
४. श्री. पोपट भोळे यांनी माईक सिस्टीम उपलब्ध करून दिली.
५. धर्मप्रेमी छायाचित्रकार श्री. कृष्णात साठे यांनी सभेची छायाचित्रे काढून ती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी दिली.
६. विक्रीकर निरीक्षक अधिकारी श्री. बंडोपंत पाटील हे अपंग असूनही सभेला उपस्थित राहिले.
७. सभेच्या अगोदर जोरदार वादळी वारा वहात होता आणि पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. या वेळी श्री नृसिंह भगवान आणि भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना केल्यावर, तसेच नामजप केल्यावर वारा थांबून सूर्यदेवतेचे दर्शन झाले.