Menu Close

गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अत्याचाराची माहिती देणार्‍या ‘गोवा फाईल्स’ ३ मे या दिवशी खुल्या करणार ! – हिंदु रक्षा महाआघाडी

हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे असतील प्रमुख वक्ते !

पणजी – गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अनन्वित अत्याचार अन् मोठा वंशसंहार यांची माहिती देणार्‍या ‘गोवा फाईल्स’ येत्या मंगळवार, ३ मे या दिवशी गोव्यातील जनतेसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात दुपारी ४.३० वाजता हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने योजलेल्या भगवान श्री परशुराम जयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे, असे हिंदु रक्षा महाआघाडी, गोवाचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यानी २८ एप्रिलला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत घोषित केले. या वेळी व्यासपिठावर डॉ. सूरज काणेकर, सहनिमंत्रक श्री. संदीप पाळणी, राज्य संयोजक आणि सुकाणू समितीचे सदस्य प्रा. प्रवीण नेसवणकर, सौ. शुभा सावंत, श्री. गोविंद चोडणकर, प्रा. दत्ता पु. नाईक ( शिरोडा), श्री. नितीन फळदेसाई अन् सुरेश डिचोलकर उपस्थित होते.

डावीकडून सौ. शुभा सावंत, श्री. गोविंद चोडणकर, बोलतांना प्रा. सुभाष वेलिंगकर, डॉ. सूरज काणेकर आणि प्रा. प्रवीण नेसवणकर

हिंदु रक्षा महाआघाडीच्या या ‘गोवा फाइल्स’ खुल्या करणार्‍या या कार्यक्रमाच्या अंतर्गत ३ मे ते २२ मे अशा २० दिवसांच्या एका जागरण मोहिमेचा शुभारंभ केला जाईल. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित रहाणार असून त्यांच्याच हस्ते या ‘गोंयकार जागरण मोहिमे’चे उद्घाटन होणार आहे. जागरण मोहिमेत जनतेत रूढ झालेले अपसमज ऐतिहासिक तथ्ये आणि दस्तऐवज यांच्या आधारे दूर करण्यासाठी पुढील सूत्रांवर भर दिला जाणार आहे.

१. ‘गोवा ही भगवान परशुरामनिर्मित भूमी ! हीच गोव्याची ओळख. भगवान परशुराम हाच गोव्याचा निर्मितीपासूनचा ‘रक्षणकर्ता’ (गोंयचो सायब) !

२. चर्चने संतपद बहाल केलेले जेजुईट पाद्री फ्रान्सिस झेवियर हा कदापि, (पोर्तुगीज गुलामगिरीतून मुक्त झालेल्या गोव्याचा) ‘गोंयचो सायब’ नव्हेच नव्हे !

३. गोव्यातील हिंदु आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवर अघोरी नृशंस अत्याचार अन् नरसंहार करण्यासाठी चर्च आणि पोर्तुगीज यांनी वापरलेली ‘होली ( गोवा) इन्क्विझिशन’ ही राक्षसी यंत्रणा सक्तीच्या धर्मांतरांसाठी गोव्यात आणण्यास सर्वथा उत्तरदायी फ्रान्सिस झेवियर हाच होता.

४. गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’ने तब्बल २५२ वर्षे केलेल्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला दिली जाणार आहे.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

या ‘गोंयकार जागरण मोहिमे’ची माहिती डॉ. सूरज काणेकर यांनी दिली. गोवा इन्क्विझिशनच्या अत्याचारांची माहिती देणारे प्रदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ मे या दिवशी कार्यक्रमस्थळी लावले जाणार आहे. हे प्रदर्शने संपूर्ण गोवाभर फिरवण्यात येईल. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करण्याची आणि गोव्यात धर्मांतराला थारा न देण्याची जी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे, त्याचे हिंदु रक्षा महाआघाडी स्वागत करत आहे. या कामी लागणारे सर्व सहकार्य हिंदु रक्षा महाआघाडी मुख्यमंत्र्याना करील, असेही प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.

३ मेच्या भगवान परशुराम जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु रक्षा महाआघाडीच्या शेवटी करण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *