बेंगळुरू (कर्नाटक) येथील बोम्मसंद्रा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा
बेंगळुरू (कर्नाटक) – सध्या हिंदु धर्मावर अनेक आघात होत आहेत. ते रोखण्यासाठी आपण सर्व हिंदूंनी जातीभेद दुर्लक्षून एकवटले पाहिजे. आपल्या भारतीय परंपरेत अतिथी सत्कार, गुरुकुल पद्धती असे अनेक सदाचार आहेत; परंतु आज शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास, उदा. कुंकू, बांगड्या आदी परिधान करण्यास देत नाहीत. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणे, हे आपलेच उत्तरदायित्व आहे, असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे श्री. श्रीनिवास रेड्डी यांनी केले. बोम्मसंद्रा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सध्या देशात हिंदूंना स्वतःचे अस्तित्व शोधण्याची परिस्थिती ओढवली आहे ! – अधिवक्ता पटापट प्रकाश, अध्यक्ष, आनेकल वकील संघ
अनेक जाती असलेल्या आमच्या देशाची विविधता आम्ही जाणून घेतली पाहिजे. सध्या आपल्याच देशात हिंदूंना स्वतःचे अस्तित्व शोधण्याची परिस्थिती ओढवली आहे. ‘आपण सर्व एकच’, हा भाव हृदयातून उमटला पाहिजे. तेव्हाच आपण समानता आणि भ्रातृत्वाने देश उभा करू शकतो.
हिंदूंनी संघटित होऊन हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न करावेत ! – मोहन गौडा, राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आपल्या देशाचा इतिहास पहाता मोगलांच्या आक्रमणांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना संघटित करून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. दक्षिण भारतात राजा हरिहर बुक्क यांनी हिंदु धर्माचे रक्षण केले.’ त्याचप्रमाणे आपण सर्वांनीही प्रयत्न करायचे आहेत.