Menu Close

‘गोवा फाइल्स’ ३ मेला खुल्या होणारच : हा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील लढा !

‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

पणजी – गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अनन्वित अत्याचार अन् मोठा वंशसंहार यांची माहिती देणार्‍या ‘गोवा फाइल्स’ येत्या ३ मे या दिवशी गोव्यातील जनतेला खुल्या करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंतर्गत ३ ते २२ मे असा २० दिवसांच्या एका जागरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येईल.

प्रा. सुभाष वेलिंगकर

‘फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब’ (गोव्याचा साहेब) होऊ शकत नाही’, या माझ्या विधानाला काही ख्रिस्ती नेत्यांनी विरोध केलेला असला, तरी ‘हिंदु रक्षा आघाडी’चा पूर्वघोषित कार्यक्रम होणारच आहे, असे सडेतोड उत्तर हिंदु रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी विरोधकांना दिले आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘हा लढा हिंदू आणि ख्रिस्ती किंवा मुसलमान असा नाही. हा लढा धार्मिक तेढ निर्माण करणारा नाही, तर हा लढा गोवा विरुद्ध पोर्तुगिजांची जुलमी राजवट असा आहे. सत्य लोकांसमोर मांडणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे आणि माझे विधान मागे घेण्याचा प्रश्‍नच येत नाही.’’

विरोध करणार्‍यांना ‘गोवा इन्क्विझिशन’ झालेच नाही’, असे सांगायचे आहे का ?

माझ्या विरोधात विधान करणार्‍यांनी आम्ही उपस्थित केलेल्या काही साध्या प्रश्‍नांवर कोणतेच भाष्य केलेले नाही. ‘गोवा फाइल्स’मुळे धार्मिक सलोखा बिघडू शकत नाही, तर हा लढा गोमंतकीय विरोधात पोर्तुगिजांची जुलमी राजवट, असा आहे. माझ्या विधानाला विरोध करणार्‍यांनी ‘गोवा इन्क्विझिशन’ झालेच नाही, असे सांगायचे आहे का? फ्रान्सिस झेवियर याने पोर्तुगाल शासनाला लिहिलेल्या पत्रामुळे गोमंतकियांवर ‘इन्क्विझिशन’ लादले गेले नाही का ? फ्रान्सिस झेवियर पोर्तुगीज साम्राज्यासाठी लढत नव्हता का ? ज्यांनी गोमंतकियांवर ‘इन्क्विझिशन’ लादले त्याला ‘गोंयचो सायब’ कसे म्हणता येईल. फ्रान्सिस झेवियर याला ‘गोंयचो सायब’ असे संबोधल्यास गोव्यातील नरसंहारात आमचे जे पूर्वज हिंदू आणि ख्रिस्ती मारले गेले ते आणि गोवा मुक्तीसंग्रामात प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक यांना अपकीर्त करण्यासारखे होईल, तसेच गोमंतकियांवर ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून अत्यंत क्रूरतेने अत्याचार करणार्‍या फ्रान्सिस झेवियर याला मानवता आणि राष्ट्रीयत्व या दोन निकषांच्या आधारावर ‘गोंयचो सायब’, असे संबोधणे अत्यंत चुकीचे ठरणार आहे. गोवा मुक्त होऊन आता ६० वर्षे पूर्ण झालेली आहेत. स्वतंत्र गोमंतकात असे करता येणार नाही.

माझे विधान शासनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांवर आधारित

काँग्रेस शासनाने गोवा स्वातंत्र्यलढ्याला अनुसरून दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. मनोहर सरदेसाई यांची गोवा स्वातंत्र्यलढ्याविषयीचे दोन खंड आणि गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक टी.बी. कुन्हा यांच्या ‘डि नॅशनलायझेन ऑफ गोवा’ ही पुस्तके गोवा शासनाचे क्रीडा, तसेच कला आणि संस्कृती खाते या दोन खात्यांनी प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये ‘इन्क्विझिशन’ आणि फ्रान्सिस झेवियर यांनी ‘इन्क्विझिशन’ लादण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रांचाही उल्लेख आहे. माझे विधान शासनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांवर आधारित आहेत.

विरोधकांनी त्यांची मते गोमंतकियांवर लादू नयेत !

गोव्याचा इतिहास ठाऊक असूनही आपल्या आईवर अत्याचार करणार्‍यांनाच आम्ही देव असे संबोधित असू, तर ही विसंगती आहे. गोव्यातील राष्ट्रवादाचे जनक टी.बी. कुन्हा यांच्या मते हे अराष्ट्रीयीकरण आहे. मिकी पाशेको यांनी मला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कह्यात घेण्याची मागणी केली आहे. ‘इन्क्विझिशन’ संबंधी किंवा फ्रान्सिस झेवियरसंबंधी सूत्र राष्ट्रीयत्वाशी कसे निगडित आहे ? लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हा लढा आहे. विरोधकांनी त्यांची मते गोमंतकियांवर लादू नयेत. माझ्या विधानाला विरोध करणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही आतंकवाद्यांशी संबंधित संघटना आहे आणि तिच्यावर बंदी घालण्यासाठी केंद्र आणि गोवा शासन प्रयत्नशील आहे.

मला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संपर्क साधून आमच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. जनशक्ती आमच्या बाजूने आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *