ठाणे : डोंबिवलीमध्ये काही मंदिरांबाहेर महिलांनी मॅक्सी घालून मंदिरात येऊ नये, असे फलक मंदिरांच्या प्रवेश दारावरच लावल्याने डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याविषयी संबंधित मंदिर प्रशासनाने आम्ही श्रद्धाळू आहोत; मात्र अंधश्रद्धाळू नाही. मंदिरांची पवित्रता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. (मंदिराच्या पावित्र्य रक्षणासाठी कृतीशील असलेल्या कोपरगाव येथील मंदिरांच्या व्यवस्थापनांचा अभिनंदनीय निर्णय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
डोंबिवली पूर्वेकडील कोपरगाव येथील गावदेवी मंदिर, महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर येथे महिलांना मॅक्सी घालून येण्यास बंदी घालण्यात आली असून याविषयी मंदिराबाहेर तसे फलक लावण्यात आले आहे. राज्यभर चालू असणार्या महिलांना मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. याविषयी गावदेवी मित्रमंडळ आणि तीनही मंदिरांची देखभाल करणारे शिवसेना नगरसेवक श्री. रमेश म्हात्रे यांनी आम्ही पुरोगामी विचारसरणीचे आहोत. अंधश्रद्धाळू नाही; परंतु मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले. या निर्णयाचे ग्रामस्थांनीही समर्थन केले आहे.