Menu Close

गोव्याचा रक्षणकर्ता फ्रान्सिस झेवियर नव्हे, तर भगवान श्री परशुराम !

परशुरामभूमी गोमंतक !

 

१. फ्रान्सिस झेवियरविषयी अंधपणे पोसलेला भ्रम हद्दपार होणे आवश्यक !

प्रा. सुभाष वेलिंगकर

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाप्रमाणे फ्रान्सिस झेवियरने प्रयत्नपूर्वक ‘गोवा इन्क्विझिशन’च्या (धर्मसमीक्षण सभेच्या) माध्यमातून आपल्या पूर्वजांवर केलेले आणि आतापर्यंत दडपण्यात आलेले नृशंस अत्याचार जगासमोर मांडण्याची वेळ आली आहे. गोव्यामध्ये पोर्तुगिजांची सत्ता बळकट करण्यासाठी ‘इन्क्विझिशन’चा वरवंटा चालवण्यात आला आणि त्याखाली हिंदू अन् नवख्रिस्ती यांचा अमानुष नरसंहार घडवण्यात आला. हा नरसंहार घडवण्यासाठी कारणीभूत असलेला जेझुईट पाद्री फ्रान्सिस झेवियर अचानकपणे ‘गोंयचो सायब’ (रक्षणकर्ता) कधी बनला ? त्याला हे कुणी बनवले ? तर झेवियरचा ‘गोंयचो सायब’ हा शब्दप्रयोग पोर्तुगीज सरकार आणि चर्च यांनी रूढ केला, तसेच त्याला जाणीवपूर्वक बेमालूमपणे सर्वदूर पसरवण्यात आले. ऐतिहासिक (पोर्तुगीज अधिकृत कागदपत्रांसह) पुराव्यांच्या आधारे ‘गोंयच्या तथाकथित सायबा’विषयी इतकी वर्षे लादलेला आणि आम्ही अंधपणे पोसलेला हा भ्रम आता हद्दपार होणे आवश्यक आहे.

२. झेवियरला ‘गोंयचो सायब’ ठरवण्यामागील इतिहास 

वर्ष १६८३ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याला पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आक्रमण केले. त्यांनी २५ नोव्हेंबर या दिवशी जुवे बेटावर पोर्तुगीज विजरईचा (व्हॉइसरॉयचा) पराभव केला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी बार्देश आणि सासष्टी यांच्यावर आक्रमण केले. त्या वेळी मराठे बार्देश आणि सासष्टीमध्ये २६ दिवस थांबले होते. रायतूर, मुरगाव, आग्वाद, रेईश मागुश हे किल्ले आणि गोवा बेट एवढेच पोर्तुगिजांकडे शेष राहिले होते. वर्ष १६८३ मध्ये पोर्तुगीज जेरीस आले होते आणि त्यांचे हे ‘पूर्वेकडील साम्राज्य’ नामशेष होण्याच्या मार्गावर होते. तेव्हा पराभूत विजरई अगतिक होऊन ‘ओल्ड’ गोव्याच्या बाँ जिझस चर्चमध्ये गेला. तेथे त्याने झेवियरची शवपेटी उघडून त्या शवावर त्याचा राजदंड ठेवला आणि ‘त्याने गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचे रक्षण करावे’, अशी प्रार्थना केली.

अशा प्रकारे पोर्तुगिजांना जेरीस आणल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गोवा बेटावर निर्णायक चढाई करण्याच्या विचारात होते. त्याच वेळी औरंगजेबाचा मुलगा शहा आलम १ लाख सैन्यासह पोर्तुगिजांच्या साहाय्यासाठी गोव्याजवळ पोचला. त्यामुळे दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांना माघारी परतावे लागले. त्यामुळे ‘झेवियरने पोर्तुगीज सत्तेचे रक्षण केले’, असे सोयिस्करपणे समजण्यात आले. त्याला ‘झेवियरचा चमत्कार’ ठरवण्यात आले आणि तेव्हापासून ‘गोंयचो सायब’ असे नवीन नामकरण जन्माला घातले गेले.

३. मानवजातीचा भक्षक असलेला झेवियर स्वतंत्र गोव्याचा ‘गोंचो सायब’ (रक्षक) कसा असू शकतो ?

पोर्तुगिजांच्या मते झेवियरच्या शवाने गोव्यातील पोर्तुगीज साम्राज्याचे रक्षण केले ! (तेही आपल्या छत्रपती संभाजी महाराजांपासून) तेव्हा त्यांनी भलेही त्यांना ‘गोंयचो सायब’ ठरवले असेल; पण आता गोवा हे स्वतंत्र राज्य आहे. त्यामुळे या स्वतंत्र गोव्याचा झेवियर हा ‘गोंयचो सायब’ कसा होऊ शकतो ? आताही त्याला असे समजणे, हा भारतीय सार्वभौम राष्ट्राशी सरळसरळ द्रोह आहे.

दुसरे असे की, या गोव्यात ज्याने धर्माच्या गोंडस नावाखाली आमच्या पूर्वजांवर अमानवी अत्याचार करून नरसंहार घडवला, अशा क्रूरकर्मा झेवियरला मानवतेच्या कोणत्या कसोटीवर आपण ‘गोंयचो सायब’ ठरवतो ? भक्षक हा रक्षक बनू शकतो का ? यामुळे झेवियर हा आपला ‘सायब’, म्हणजे रक्षणकर्ता असू शकत नाही.

४. कोकणची निर्मिती करणारा श्रीविष्णूचा ६ वा अवतार भगवान परशुराम हाच प्राचीन काळापासून गोव्याचा खरा रक्षणकर्ता !

मुक्त गोव्यामध्ये इतिहासाच्या, राष्ट्रीयतेच्या आणि मानवतेच्या निकषांवर कुठेही न बसणाऱ्या झेवियरला ‘गोंयचो सायब’ संबोधून तमाम गोंयकार, धर्मच्छलामध्ये बळी पडलेले आमचे पूर्वज आणि गोवा मुक्तीसाठी पोर्तुगिजांविरुद्ध लढून सर्वस्वाचे बलीदान केलेले स्वातंत्र्यसैनिक यांचा अपमान करणे यापुढे थांबले पाहिजे. त्यासाठी ३ मे २०२२ या दिवशी असलेल्या भगवान परशुराम जयंतीपासून पुढील १५ दिवस आपण गोव्यामध्ये शक्य तेथे यथाशक्ती श्री परशुराम जयंतीचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि त्या ठिकाणी पुढील विषयांवर हिंदु समाजामध्ये जागृती करावी.

१. भगवान परशुराम हेच ‘गोव्याचे रक्षणकर्ते’ (फ्रान्सिस झेवियर नव्हेच नव्हे !)

२. ‘गोवा इन्क्विझिशन’ हे गोव्यामध्ये आणून आपल्या पूर्वजांवर अत्याचार आणि नरसंहार लादण्याला झेवियर हाच सर्वथा उत्तरदायी आहे.

३. ‘गोवा इन्क्विझिशन’ने गोव्यात केलेल्या अत्याचारांविषयी माहिती देणे.

चला, परमेश्वराने आपल्या पिढीवर सोपवलेले दायित्व आपण सर्वजण कर्तव्यबुद्धीने पार पाडूया !’

। भारतमाता की जय ।

– हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *