पुणे – जेजुरी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने सर्वपरिचित आहे. या ठिकाणी वर्षभरात लाखो भाविक, पर्यटक भेट देतात. नेहमीप्रमाणे धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून श्री मार्तंड देवस्थान, जेजुरीने १ मे या दिवशी मुसलमानांसाठी जामा मशीद येथे ‘इफ्तार पार्टी’चे (इफ्तारच्या मेजवानीचे) आयोजन केले होते. याची पोस्ट सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यावर भक्तांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. ‘सर्व काही करा; पण राजाचा भंडारा पालटू नका, असे पहाण्याची सामान्य लोकांना सवय नाही’, अशी प्रतिक्रिया एका भाविकाने व्यक्त केली आहे. (याविषयी देवस्थान मंडळाला काय म्हणायचे आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
हडपसर येथील तुळजाभवानीमाता मंदिरात इफ्तार !
हडपसर (पुणे) – येथील शिवसमर्थ संस्थेच्या वतीने महात्मा फुले वसाहत येथील श्री तुळजाभवानी मंदिरात महाआरती आणि रोजे इफ्ताराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे ६ वे वर्ष आहे. (अशा संस्था कधी मशिदीत गुढीपाडवा किंवा श्रीरामनवमी साजरी करण्यासाठी पुढाकार घेतात का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
या वेळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी अभ्यासिकेतील बाल आणि तरुण मुसलमान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, पत्रकार दीपक वाघमारे, शौकत शेख, हमीद शेख आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे यांनी केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे म्हणाले, ‘‘कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामाजिक सलोखा अन् चांगले संस्कार बाल आणि तरुण वयात होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.’’