Menu Close

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांच्या नावाने शपथ घेतल्याने अधिष्ठाता निलंबित !

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी शपथ घेताना

मदुराई (तमिळनाडू) – येथील मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पेशा स्वीकारतांना दीक्षा सत्राच्या प्रारंभी प्रथमच ‘हिप्पोक्रॅटिक शपथे’च्या ऐवजी ‘महर्षि चरक’ यांच्या नावाने शपथ घेतली. तमिळनाडूच्या  स्टॅलिन सरकारने या पालटाविषयी नापसंती व्यक्त केली. या प्रकरणी तातडीने कारवाई करत राज्य सरकारने महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. ए. रथिनवेल यांना निलंबित केले. या दीक्षा समारंभात राज्याचे अर्थमंत्री पी.टी.आर्. पलानीवेल थियागा राजन आणि महसूलमंत्री पी. मूर्ती उपस्थित होते.

अधिष्ठाता (डीन) डॉ. ए. रथिनवेल

 

या प्रकरणी तमिळनाडूचे आरोग्यमंत्री एम्. सुब्रह्यण्यम् यांनी आरोग्य विभागाचे सचिव डॉ. नारायण बाबू यांना नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी रथिनवेल यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने अद्यादेश काढला आहे. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेहमी ‘हिप्पोक्रॅटिक शपथ’ घ्यावी, असा आदेश दिला आहे.

काही मासांपूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने एम्.बी.बी.एस्.च्या नवीन अभ्यासक्रमामध्ये देशातील विद्यार्थ्यांसाठी ‘हिप्पोक्रॅटिक शपथ’च्या ऐवजी महर्षि चरक शपथ घेण्याची शिफारस केली होती. महर्षि चरक यांच्या शपथेमध्ये, ‘रुग्णाला झालेल्या आजाराचे सुयोग्य निदान करून त्यावर योग्य असे उपचार होतील, हे प्राधान्याने पाहीन, तसेच रुग्णाच्या खासगीपणाचा आदर करून त्याच्या आजाराविषयी गोपनीयता राखेन’ असे म्हटले आहे.

‘हिप्पोक्रेटस’च्या नावाने घेतली जाणारी ‘हिप्पोक्रेटिक’ शपथ म्हणजे काय ?

 

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘हिप्पोक्रेटिक’ शपथ घ्यावी लागते. ‘हिप्पोक्रेटस’ हा ग्रीक डॉक्टर होता. त्याचा कार्यकाळ ख्रिस्ताब्ध पूर्व ४६० ते ३७५ असा मानला जातो. त्यापूर्वी ‘आजारपण हे देवाच्या अवकृपेमुळे येते’, असे मानले जात होते; मात्र हिप्पोक्रेटसने हे खोडून काढत ‘आजारपण हे नैसर्गिक कारणांमुळे येते’, असा सिद्धांत मांडला. तेव्हापासून त्याला औषधशास्त्राचा जनक मानले जाते. त्याच्या नावे घेण्यात येणाऱ्या या शपथेनुसार, ‘वैद्यक विद्या ही अतिशय प्रतिष्ठेची असून तिचा वापर विवेकाने करीन. रुग्णाचे आरोग्य हेच माझ्यासाठी प्राधान्य असून त्याच्याविषयी गोपनीयता राखणे, हे माझे कर्तव्य आहे’, अशी शपथ घेण्यात येते. डॉक्टरचा पांढरा कोट परिधान करण्यापूर्वी प्रत्येकाला ही शपथ घ्यावी लागते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *