Menu Close

हिंदुद्वेषाची परमावधी !

अधिष्ठाता (डीन) डॉ. ए. रथिनवेल
तमिळनाडू राज्यातील मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दीक्षा समारंभाच्या आरंभी महर्षि चरक यांनी दिलेली शपथ घेतली. त्यामुळे तेथील द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) पक्षाच्या सरकारने या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाते आधुनिक वैद्य ए. रथिनवेल यांना थेट निलंबितच केले. ही घटना ‘पाक किंवा अफगाणिस्तान येथे घडत आहे कि काय ?’, अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. यामुळे भारताच्या एका राज्यातील सरकार हिंदुद्वेषाने किती पछाडलेले आहे, हे लक्षात आले. महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना थेट निलंबित करण्याएवढी त्यांनी अशी काय मोठी चूक केली ? विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी स्वसंस्कृतीचा अभिमान बाळगत संपूर्ण जगातील वैद्यकशास्त्राचे एक जनक महर्षि चरक यांनी सांगितल्याप्रमाणे शपथ घेतली. खरे तर स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारनेच संपूर्ण देशामध्ये ही पद्धत घालणे आवश्यक होते; परंतु सनातन संस्कृती, संस्कृत आणि आयुर्वेद यांचा ओतप्रोत द्वेष करणाऱ्या नेहरू सरकारच्या काँग्रेसने तसे न केल्याने त्याचे दुष्परिणाम आजही आपण भोगत आहोत, हे यातून लक्षात येते.

रोगांच्या कारणांमधील आध्यात्मिक भाग नाकारणारा पहिला विज्ञानवादी !

हिप्पोक्रेटस हा ख्रिस्ताब्द पूर्व ४६० ते ३७५ या काळातील एक ग्रीक आधुनिक वैद्य होता. त्याने आधुनिक चिकित्साशास्त्रानुसार काही प्रयोग आणि चिकित्सा केल्या. त्यापूर्वी त्या भागामध्ये लोकांवर पुरोहित उपचार करत असत. विशेष म्हणजे त्या वेळी ‘आजारपण हे देवाच्या अवकृपेमुळे होते’, असे मानले जात होते आणि आजारी माणसे मंदिरात जात, देवाला काही वस्तू भेट देत आणि नंतर पुरोहित त्यांना काही औषधी देत असत.

फिजिशियन हिप्पोक्रेट्स

हिप्पोक्रेटसने ‘आजारपण हे नैसर्गिक कारणामुळे येते’ असे घोषित केले आणि त्यातील दैवी भाग न्यून करण्यास आरंभ केला. हिप्पोक्रेटसचे वडील स्वतः पुरोहित होते. हिप्पोक्रेटसने आरंभी सिद्ध केलेल्या शपथेत ‘देवतेच्या नावाने शपथ घेतो’, असा स्पष्ट उल्लेख होता; कालांतराने त्याने तो काढला; कारण त्याने तो अंधविश्वास मानला. त्यामुळे हिप्पोक्रेटसला एकप्रकारे ‘देवतेची कृपा किंवा अवकृपा होते’, हे नाकारणारा ‘पहिला विज्ञानवादी’ असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. त्यानंतर युरोपमधील तथाकथित ‘सभ्य संस्कृती’ने त्याला ‘आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा जनक’ म्हणून संबोधले. त्याच्या शास्त्राचेही अंधानुकरण लोकांनी केल्याने त्यातही कित्येक शतके सुधारणा झाली नाही. त्यामुळे १५ व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये नाभिकच दात काढत असे. अध्यात्मशास्त्रानुसार कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक रोगामध्ये काही टक्के कारणे ही आध्यात्मिक स्वरूपाची असतात आणि त्यामुळे साहजिकच त्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावे लागतात. हिप्पोक्रेटसच्या पूर्वी हे सत्य ग्रीकांना ठाऊक असल्याने त्यांनी रुग्णाला मंदिरात बोलावणे आणि औषधी देणे असे दोन्ही भाग चालू ठेवले होते. देवतेची कृपा आणि अवकृपा या संकल्पना नाकारणारा आधुनिक वैद्य हिप्पोक्रेटस तमिळनाडूच्या हिंदुद्वेषी मुख्यमंत्र्यांना महर्षि चरक यांच्यापेक्षा अधिक जवळचा वाटला, तर नवल ते काय ? वैचारिकदृष्ट्या एखादी गोष्ट पटणे न पटणे, असू शकते; परंतु त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वाेच्च अधिकाऱ्याला थेट निलंबित करणे, ही कृती पराकोटीचा हिंदुद्वेष नाही, तर दुसरे काय दाखवते ?

सनातन संस्कृतीचे महत्त्व जाणा !

महर्षि चरक यांचा जन्म हिप्पोक्रेटस याच्या नंतरच्या काळातील म्हणजे ख्रिस्ताब्द पूर्व ३०० ते २०० मधील आहे; परंतु विविध रोगांवरील त्यांचे संशोधन हे केवळ अवर्णनीय आहे. तक्षशिलेमध्ये शिक्षण घेतलेले कुषाण राजाचे राजवैद्य चरक यांनी ‘रोग होऊ न देण्यासाठी जीवनपद्धती कशी हवी ?’, यावर भर दिला. सूक्ष्म कृमींना नष्ट करण्यासाठी त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणारे ‘यंत्र’ दिले. उगमापासून अंतापर्यंत नद्यांच्या प्रवाहातील विविध गुणधर्मांचे ज्ञान, आळसामुळे निर्माण होणारे रोग, शरिरातील विद्युत् प्रवाह आदी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला. शरिराची ६ अंगे, नवद्वारे, ३६० हाडे, ९०० स्नायू, २०० धमन्या, ४०० पेशी, १०७ मर्मस्थाने, २०० संधी आणि २९ सहस्र ९५६ शिरा यांचे वर्णन त्यांनी केले.

आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक

विविध धातूंपासून औषधे कशी निर्माण करायची ? याचा उल्लेख चरक संहितेत आहे. आजच्या आधुनिक विज्ञानयुगात मानवाचे जीवनचक्र निसर्गाच्या विरोधात गेल्याने अनेक रोगांची निर्मिती होऊन तो त्रास भोगत आहे. या पार्श्वभूमीवर ‘रोग होऊ न देणारी जीवनपद्धती’ अंगीकारण्यास भर देणारे महर्षि चरक यांचे महत्त्व लक्षात येते. आजही ‘चरक संहिता’ हा आयुर्वेदातील अद्वितीय ग्रंथ मानला जातो. आयुर्वेद हा वेदांचा एक भाग आहे. विश्वात वेद हेच सर्वांत प्राचीन आहेत. त्यामुळे वैद्यकीय शास्त्राच्या मूळ ज्ञानाचे स्रोत हे सनातन संस्कृतीतील आहेत. खरे तर प्रत्येक भारतियाला त्याचा अभिमान हवा; परंतु देशातील साम्यवाद्यांच्या नेत्यांची आडनावे असणाऱ्या स्टॅलिन यांच्यासारख्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना या अतीप्राचीन भारतीय वारशाचा यत्किंचित्ही अभिमान तर सोडाच; उलट द्वेषच आहे आणि म्हणूनच वैद्यकीय विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांनी सांगितलेली शपथ घेतलेली त्यांना चालली नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, महर्षि चरक यांनी सांगितलेली शपथ घेणे, हे सर्वांसाठी बंधनकारक नाही; पण जर काही विद्यार्थ्यांना ती घ्यावीशी वाटली, तर तमिळनाडू सरकार त्यांना शिक्षाही करू शकत नाही. येथे लक्षात घ्यायचे सूत्र म्हणजे विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांनी उद्धृत केलेली शपथ घेणे, हेही एक काळ पालटत चालल्याचे द्योतक आहे. आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. जगाला सनातन भारतीय संस्कृतीविना पर्याय नसतांना स्टॅलिन यांच्यासारखे लोक येत्या काळात कुठे असतील ? याचे त्यांनी चिंतन करावे !

महर्षि चरक यांनी सांगितलेली वैद्यकीय शपथ नाकारणारे तमिळनाडू सरकार संस्कृतीद्रोहीच !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *