Menu Close

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू

जोधपूर (राजस्थान) – जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली. यात पोलीस उपायुक्त, पोलीस ठाण्याचे प्रमुख यांच्यासह अनेक जण घायाळ झाले. या वेळी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम लाठीमार केला आणि नंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेेनंतर जोधपूरमध्ये अनिश्‍चित काळासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला, तसेच येथे अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर ३ मे या दिवशी सकाळी पुन्हा येथे धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले.

. २ मेच्या रात्री ११.३० वाजता जालोरी गेट चौकातील स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर ध्वज आणि ईदशी संबंधित फलक लावल्यानंतर एका समुदायाच्या लोकांनी घोषणाबाजी केली. ज्या भागात नमाजपठण केले जाते, तेथे भगवान श्री परशुरामाचे ध्वज होते. ईदनिमित्त स्थानिक मुसलमान ध्वज लावत असल्याने श्री परशुरामाचे ध्वज हटवण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले.

२. पोलीस आयुक्त नवज्योती गोगोई यांनी सांगितले की, घटनास्थळी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि घटनास्थळी दोन्ही पक्षांनी केलेले भ्रमणभाषवरील चित्रीकरण तपासले जात आहे.  दगडफेक कुणी चालू केली ?, तसेच ज्यांनी दगडफेक केली, त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

पोलिसांकडून हिंदूंवर लाठीमार ! – भाजपच्या आमदारांचा आरोप

रात्री उशिरा सूरसागर मतदारसंघातील भाजपच्या महिला आमदार सूर्यकांता व्यास आणि महापौर विनिता सेठ घटनास्थळी पोचल्या. जालोरी गेट पोलीस चौकीबाहेर बसून दोघींनी पोलिसांनी हिंदूंवर केलेल्या लाठीमाराचा निषेध केला. ‘दोन्ही बाजूंनी दगडफेक होत असतांना पोलिसांनी केवळ हिंदूंवरच लाठीमार का केला?’, असा प्रश्‍न व्यास यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे केली. या हिंसाचाराच्या वेळी आमदार व्यास यांच्या घरासमोरील दुचाकी जाळण्यात आली.

 

शांतता आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा ! – मुख्यमंत्री

या हिंसाचारानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘कोणत्याही परिस्थितीत शांतता, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे. जोधपूर, मारवाड येथील प्रेम आणि बंधुभावाच्या परंपरेचा आदर करत मी सर्व पक्षांना शांतता आवाहन करतो.’

पोलिसांकडून धर्मांधांवर कारवाई करण्यास टाळाटाळ ! – केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, धर्मांधांनी अनेक वाहनांची तोडफोड केली, तसेच मंदिरावरही आक्रमण केले. हिंदूंच्या दुकानांत घुसून तोडफोड केली. हिंदूंच्या घरात घुसून हिंदु महिलांचा विनयभंग केला. लहान मुलींचे कपडे फाडले. एका हिंदूच्या पोटात सुरा खुपसला.

 

असे असतांना त्यांना विरोध करणार्‍या हिंदूंवर पोलिसांनी लाठीमार केला. हिंसाचार केल्यानंतरही धर्मांध चौकात उभे असतांना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. पोलिसांनी अद्यापही धर्मांधांवर गुन्हेसुद्धा नोंदवलेले नाहीत. जर पोलीस कारवाई करणार नसतील, तर आम्ही आंदोलन करू.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *