Menu Close

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

दीपप्रज्वलन करतांना (उजवीकडून) सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुनील घनवट, अधिवक्ता सुशील अत्रे
जळगाव – हिंदु राष्ट्रासाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज आवश्यक असून याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे मावळ्यांचे संघटन करून छत्रपतींनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. त्याचप्रमाणे ‘सामर्थ्य आहे चळवळेंचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार हिंदूंनी साधना करून भगवंताचे अधिष्ठान प्राप्त करणे आवश्यक ठरते. आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

अधिवेशनास उपस्थित धर्मप्रेमी

अधिवेशनाचे उद्घाटन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी व्यासपिठावर अधिवक्ता सुशील अत्रे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. या अधिवेशनात वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. शेवटी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. अधिवेशनास जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मालेगाव येथील पुष्कळ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

गटचर्चेत सहभागी हिंदुत्वनिष्ठ

सन्मान आणि सत्कार : सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान जळगाव येथील उद्योजक श्री. उमेश सोनार यांनी केला. अधिवक्ता सुशील अत्रे यांचा सत्कार धुळे येथील हिंदु एकता आंदोलन पक्षाचे श्री. मनोज घोडके यांनी, तर श्री. सुनील घनवट यांचा सत्कार धुळे येथील श्री. विलास राजपूत यांनी केला.

वक्त्यांचे मार्गदर्शन

कायदे मान्य नसतील, तर ते अधिकृत यंत्रणेकडून रद्दबातल ठरवावेत ! – अधिवक्ता सुशील अत्रे, जळगाव

हिंदु धर्म कोणत्याही एका ग्रंथावर आधारलेला नसून ते एक सर्वसमावेशक वैश्विक तत्त्व आहे. अन्य धर्मियांना आपापल्या धर्मग्रंथांविषयी जितकी आस्था आहे, तितकी हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी दिसून येत नाही. जातीला धर्मापेक्षा जास्त महत्व दिले जाते. निधर्मी असल्याचा आव आणण्यात देशातील लोकप्रतिनिधी निष्णात आहेत. संसदेने पारित केलेले ३ कृषी कायदे जनरेट्यापुढे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. कायदेभंग हे एक शस्त्र आहे. ते योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या व्यक्तीविरुद्ध वापरायचे असते. कायदे मान्य नसतील, तर ते अधिकृत यंत्रणेकडून रद्दबातल ठरवावे लागतात.

गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन आवश्यक ! – डॉ. अभय रावते, यावल

गडकिल्ल्यांविषयी हिंदूंमध्ये उदासीनता दिसून येते. यावल येथील राजे निंबाळकर या ऐतिहासिक किल्ल्याची दुरवस्था झाली असून काही स्वयंसेवकांनी त्याची स्वच्छता केली. फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रथमच या किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. ‘एक दिवस महाराजांसाठी’ अशी योजना राबवण्यात आली. यात अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेत किल्ल्याची दुरवस्था दूर करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे या ऐतिहासिक किल्ल्याची पूर्वीची आणि आताची छायाचित्रे प्रसारित केली. त्यातून लोकांना महत्व लक्षात आले.

गोमातेचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्यच ! – योगेश पाटील, गोरक्षक, एरंडोल, जळगाव

श्रीकृष्णाने स्वतः गोसेवा केलेली असून आपण प्रत्येकाने गोमातेची सेवा आणि रक्षण करणे आवश्यक आहे. ती सर्व प्रकारचे सुख प्रदान करणारी आहे. भारतात पूर्वीच्या काळी ९० कोटी असलेला गोवंश आता ८ कोटींवर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्यापूर्वी ३१० पशूधगृहे होती. ती संख्या आज ३ सहस्र ६०० इतकी झाली आहे.

हलाल जिहाद : एक भावी संकट ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ या अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार वैध ! मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल अशा अनेक गोष्टींत केली जाऊ लागली आहे. त्यासाठी खाजगी इस्लामी संस्थांकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले गेले आहे. निधर्मी भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’कडून प्रमाणपत्र घेतल्यावर खासगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का ? भारतात मुसलमानांची लोकसंख्या केवळ १५ टक्के असतांना उर्वरित ८५ टक्के हिंदूंवर ‘हलाल प्रमाणपत्र’ का लादले जात आहे ? निधर्मी भारतात अशी धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने ‘हलाल प्रमाणीकरण’ पद्धत तात्काळ बंद करावी आणि नागरिकांनी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा.

परिसंवाद : दुपारच्या सत्रात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावरील परिसंवादात उद्योजक श्री. उमेश सोनार, हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. मोहन तिवारी, ह.भ.प. जगदीश महाराज, श्री. सुनील घनवट सहभागी झाले होते. परिसंवादामुळे ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना स्पष्ट झाली. ‘यापुढे हा विषय निर्भीडपणे आणि परखडपणे मांडू शकतो’, असा आत्मविशवास वाढल्याचे उपस्थितांनी सांगितले.

गटचर्चा : अधिवेशनातून प्रेरणा घेऊन पुढे नेमके कोणत्या दिशेने प्रयत्न करणार, याविषयी सांगत उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी गटचर्चेत सहभाग घेतला. हिंदु एकता दिंडी, राष्ट्रीय हिंदू आंदोलन, हलाल उत्पादनांवर बहिष्कार, तसेच हिंदु धर्मजागृती सभा यांपैकी आपल्या गावात किंवा प्रभागात कोणते उपक्रम राबवणार, याविषयीचे नियोजन करण्यात आले.

क्षणचित्रे 

१. शंखनाद आणि मंत्रोच्चाराने अधिवेशनास प्रारंभ झाला.

२. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय संशोधित ‘गोमातेचे महत्त्व’, सनातन संस्था निर्मित ‘मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम’, ‘हिंदू एकता दिंडी’ या विषयांवरील ध्वनीचित्रचकत्या दाखवण्यात आल्या.

३. अधिवेशनामुळे कुटुंबभावना जागृत झाल्याचे अनेकांनी सांगितले.

४. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने अधिवेशनाची सांगता करण्यात आली.

उपस्थितांचे मनोगत

१. पुष्कळ ऊर्जा मिळाली आणि धर्मप्रबोधन कसे करावे, हे समजले. – श्री. अमोल कुलकर्णी, नाशिक

२. सनदशीर मार्गाने धर्मकार्य कसे करावे, हे शिकायला मिळाले. सामाजिक माध्यमांचा वापर करून अधिक प्रमाणात हिंदु राष्ट्राचा विचार पेरण्याचा प्रयत्न करीन. – श्री. मनोज घोडके, हिंदु एकता आंदोलन पक्ष, धुळे

३. मी स्वतः हलाल निर्मित उत्पादनाला विरोध करत आहे. त्यामुळे माझ्याकडे येणारे विक्रेते आता ते उत्पादन आणत नाही. यातून मला समाधान मिळते. – श्री. सूरज पाटील, निमगाव (यावल)

४. हिंदू सामर्थ्यवान झाल्यासच हिंदुत्व टिकणार आहे. – श्री. हर्षद पत्की, नंदुरबार

५. जर या देशात ९९ टक्के लोक कर भरणारे हिंदू असतील, तर ते राष्ट्र हिंदु राष्ट्रच असले पाहिजे. हिंदू संघटनांनी मतभेद दूर करून संघटितपणे कार्य करावे. स्वतःपासूनच हिंदु राष्ट्राला आरंभ करावा, तरच समाज आपले ऐकू शकतो. – श्री. सौरभ पाटील, जळगाव

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *