Menu Close

गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास झाल्याचे ठामपणे सांगणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा !

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

डॉ. टी.बी. कुन्हा

गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले. त्यांपैकी डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. ३-४ वर्षांपूर्वी ‘गोवा राज्य भारतापासून वेगळे आहे’, असे सांगण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. आताही ‘झेवियर नव्हे, तर भगवान परशुराम गोव्याचा रक्षणकर्ता’, असे म्हटल्यावर पोर्तुगीजधार्जिण्या ख्रिस्त्यांना पोटशूळ उठला. गोमंतकियांवर अत्याचार करण्यास पुढाकार घेणारा फ्रान्सिस झेवियर त्यांना ‘गोयंचो सायब’ वाटतो. हे पाहून डॉ. टी.बी. कुन्हा यांचे विचार किती सत्य आहेत, याची प्रचीती येते. ५ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोव्यातील ख्रिस्ती समाजाला मूळ भारतीय प्रवाहापासून तोडण्याच्या कारस्थानांवर पुस्तक लिहून मानवतेचा डांगोरा पिटणाऱ्या ख्रिस्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे डॉ. कुन्हा आणि आल्फान्सो द आल्बुकर्क याचा बुरखा फाडणारे डॉ. कुन्हा’, यांविषयी वाचले. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

४. धर्मांतरितांना हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यावर कडक निर्बंध घालणारे ख्रिस्ती म्हणे मानवतेचे पुजारी आणि हिंदूंना देवतांच्या मूर्तींचे भंजन करण्यास सांगून त्यातून आनंद उपभोगणारा झेवियर म्हणे संत !

स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांनी लिहिलेल्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोेवन्स’ या पुस्तकात दिले आहे, ‘घरात खासगी किंवा जाहीररीत्या ओव्या म्हणायच्या नाहीत, मिठाविना शिजवलेला भात नंतर मीठ घालून स्थानिक लोक करतात, तसे करू नये, त्यांच्या परिसरात किंवा भूमीत किंवा शेतात कुठेही तुळस नावाचं रोप आढळता कामा नये आणि कुठेही दिसल्यास उपटून टाकावे, कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीला त्याच्या पूर्वीच्या हिंदु नावाने हाक मारायची नाही, धोतर न नेसता काष्टी नेसावी, यांसारख्या अनेक गोेष्टी हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्यांवर गोव्यात लादल्या गेल्या. त्यांच्या रीतीरिवाजांचा ऱ्हास करण्यात आला. झेवियर ८ फेब्रुवारी १५४५ या दिवशी ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेला लिहिलेल्या पत्रात धर्मांतराविषयी वर्णन करतो, ‘बाप्तिस्मा घेतल्यानंतर नवख्रिश्चन आपापल्या घरी जातात आणि बायका-मुले साऱ्या परिवाराला घेऊन पुन्हा येतात अन् त्यांनाही बाप्तीस्मा घ्यायला लावतात. सगळ्यांना ‘बाप्टायज’ केल्यानंतर येथील खोट्या देवांची देवळे पाडण्याचा आणि मूर्तींचे भंजन करण्याचा हुकूम देतो. या मूर्तीची ज्या लोकांनी पूजा केली त्यांच्याकडून त्याच मूर्तींचा भंग करवतांना त्यांची मूर्ती पाडतांनाचे दृश्य बघतांना मला किती आनंद होतो, यांचे शब्दांनी वर्णन करता येत नाही’ हे या हिंदुस्थानातल्या तथाकथित संतमहात्म्याचे त्याच्या स्वतःच्याच अक्षरात नोंदवलेले कृत्य.

५. विलायती गोष्टीचे अनुकरण आणि देशी गोष्टी तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती यांमुळे गोमंतकियांची चंगळखोर वृत्ती बनणे !

गोवा स्वातंत्र्यसंग्रामातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांनी छापलेल्या या पुस्तकात इतिहासातील अनेक सत्ये उल्लेखलेली आहेत. हिंदू आणि ख्रिस्ती दोन्ही गोमंतकीय समाजातील शारीरिक अन् नैतिक दौर्बल्य, खुशामत करण्याची सवय, अभिमानशून्यता, चारित्र्यहीनता या सगळ्याला देशांतर आणि जप्तीच्या धमकीने केलेली धर्मांतराची आतंकवादी पद्धतच उत्तरदायी आहे. राष्ट्रीयत्वाच्या ऱ्हासामुळे प्रत्येक पाश्चात्त्य गोष्टीचे अनुकरण करणे आणि देशी गोष्टी तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती, यांचा परिणाम म्हणजे समाज चंगळखोर बनला आहे. तेव्हा या चक्रातून मुक्त होण्यासाठी आमच्यामध्ये स्वाभिमान आणि देशाभिमान निर्माण व्हायला मन सिद्ध केले पाहिजे. दास्यत्व, तसेच चारित्र्यहीन आणि माकडासारखी नक्कल करण्याची प्रवृत्ती यांपासून मनाला परावृत्त करायला पाहिजे. राजकीय, वैचारिक, सामाजिक, आर्थिक सर्वच गोष्टींत आपल्या शासनकर्त्यांविरुद्ध आणि आमच्या दैनंदिन सवयींविरुद्ध बंड करायला पाहिजे, असा सतत संघर्षाचा संदेश थोर सेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांनी या पुस्तकात दिला आहे.

आताच्या वर्तमानकाळातील शैक्षणिक क्षेत्रातील चर्चची वाढती दादागिरी, गोव्यात पोर्तुगीजधार्जिण्यांकडून होणारा गोवा-पोर्तुगीज सांस्कृतिक महोत्सव, गोमंतकियांची चंगळवादी मानसिकता या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. टी.बी. कुन्हा यांचे विचार आणि सत्य इतिहास कथन पुष्कळ मार्गदर्शक ठरते. गोमंतकियांनी आता राष्ट्रीयत्वाच्या ऱ्हासातून आणि अनेक शतकांच्या आतंकवादी राजवटीमुळे शासनकर्त्यांच्या गुलामगिरीचे जे बीज मनात रुजले आहे, ते उपटून टाकणे आवश्यक आहे. (समाप्त)

– श्री. जयेश थळी, म्हापसा, गोवा.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *