ठाणे : अभिनेत्री सनी लिओन हिची अश्लील वेबसाइट येत्या आठ ते दहा दिवसांत ब्लॉक करण्यात येणार असून त्याबाबत अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या स्वाक्षरीने संबंधितांना पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरुवारी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेला दिली. त्यामुळे भविष्यात सनी लिओनची वेबसाइट बंद होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
सनी लिओनी हिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला शिक्षा व्हावी आणि अश्लील वेबसाइटवर बंदी घालण्यात यावी, यासाठी डोंबिवली येथील रणरागिणी शाखेच्या सदस्या वेदिका विनोद पालन यांच्यातर्फे डोंबिवली येथील रामनगर पोलिस स्टेशनात मागील वर्षी, १४ मे रोजी तक्रार करण्यात आली होती. वेबसाइटच्या प्रक्षेपणाचे अधिकार असणाऱ्या ‘गो डॅडी’ कंपनी आणि गुगल आस्थापन यांना यापूर्वी पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र एक वर्षाहून अधिक काळ लोटूनही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने याबाबतची विचारणा रणरागिणी शाखेच्या वतीने करण्यात आली. या वेळी शिवसेना महिला शाखाप्रमुख मनीषा शेलार, सारा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सारंगी महाजन आदी उपस्थित होत्या.
कारवाईसाठी ‘सायबर सेल’कडेही पत्राची प्रत देण्यात येईल, असे आयुक्तांनी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासन दिले. सनी लिओन हिच्या वेबसाइटवर तिची स्वत:हून काढून घेतलेली अश्लील, नग्न आणि विकृत छायाचित्रे व व्हीडीओज आहेत. तसेच अश्लील आणि संभोग करत असणाऱ्या चित्रफिती विक्रीसाठीही ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वेबसाइट पहाणाऱ्याच्या मनामध्ये लैंगिक वासना जागृत होत असून त्यामुळेच समाजात बलात्काराच्या घटना वाढत आहेत, असा आरोप करून सनी लिओन हिच्यावर तत्परतेने कारवाई करण्याची मागणी रणरागिणी शाखेकडून करण्यात आली.
गेल्या वर्षी सनी लिओन तिच्या पतीसह ठाणे पोलिस आयुक्तालयात हजर झाली होती. त्यानंतर या प्रकरणात विशेष प्रगती झाली नसल्याने पोलिस आयुक्तांच्या आश्वासनानंतर हे प्रकरण निकाली लागण्याची शक्यता आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स