Menu Close

ज्ञानवापी मशिदीवरील हिंदूंची धार्मिक प्रतीके नष्ट केली जात आहेत !

हिंदु पक्षाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांचा गंभीर आरोप !

पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये यापूर्वी वर्ष १९९६ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हाही न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्ण सर्वेक्षण करता  आले नव्हते; मात्र त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला होता. त्यात मशिदीमध्ये हिंदूंच्या मंदिराशी संबंधित असलेली प्रतीके आढळून आली होती; मात्र आता ‘तेथे मंदिर होते’, हे लक्षात येऊ नये; म्हणून ती नष्ट करण्यात येत आहेत. हे मी ठामपणे सांगू शकतो, असे प्रतिपादन काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद खटल्यातील हिंदु पक्षाचे अधिवक्ते पू. हरि शंकर जैन यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून शृंगारगौरी आणि ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला असतांनाही मुसलमानांनी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यास विरोध केल्याने न्यायालय आयुक्त आणि दोन्ही पक्षांचे अधिवक्ता यांना माघारी यावे लागले होते. त्यावर पू. (अधिवक्ता) हरि शंकर यांना विचारले असता त्यांनी वरील विधान केले.

ज्ञानवापी मशिदीच्या आतील भागाचे सर्वेक्षण झाल्यावर तेथे पूर्वी मंदिर होते, हे उघड होईल !

पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन यांनी सांगितले की, मशिदीच्या बाहेरून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून आम्हाला तेथे मंदिर असल्याची अनेक प्रतीके आढळून आली. २ मोठी स्वस्तिक मशिदीच्या भिंतीवर आढळली. तसेच खंडित मूर्तींचे अवशेष सापडले. काही दगडांवर देवतांची चित्रे कोरण्यात आलेली दिसली. जेव्हा मशिदीच्या आतल्या भागातील सर्वेक्षण होईल, तेव्हा तेथे मंदिर असल्याचे पुरावे सापडतील, यावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. आम्हाला आशा आहे की, या वेळी सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. आम्ही पूर्ण क्षमतेने आमची लढई लढत आहोत आणि काशी विश्‍वनाथाला आम्ही मुक्त करूच.

असदुद्दीन ओवैसी जाणीवपूर्वक अज्ञानी बनत आहेत !

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वेक्षणाचा विरोध करतांना धार्मिक स्थळ अधिनियम १९९१चा उल्लेख केला होता. त्याविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, एकतर त्यांना काहीच ठाऊक नाही किंवा ते ठाऊक असूनही अज्ञानी असल्याचे दाखवत आहेत. या कायद्यामध्ये कोणत्याही धार्मिक स्थळाचा छेडछाड करण्यास विरोध करण्यात आला आहे. ज्ञानवापी मशिदीचे स्वरूप पूर्वीपासून मंदिर राहिलेले आहे. वर्ष १९९० पर्यंत ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा केली जात होती. मशिदीच्या चारही बाजूंनी देवतांची पूजा होत होती. जेव्हा मुलायमसिंह यादव यांचे सरकार सत्तेत होते, तेव्हाही पूजा होत होती. आजही व्यास परिवाराकडे मशिदीच्या तळघरात जाऊन म्हणजे जेथे मूळ मंदिर आहे तेथे जाऊन पूजा करण्याचा अधिकार आहे. धार्मिक स्थळ अधिनियमामुळे आम्ही आमच्या मंदिराला आक्रमकांच्या कह्यातून सोडवण्याची लढाई सोडू शकत नाही.

श्रीकृष्णजन्मभूमी, कुतूबमिनार, ताजमहाल, भोजशाळा या वास्तूही मुक्त करणार !

आमच्या सूचीमध्ये केवळ ज्ञानवापीच नाही, तर मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर, तसेच कुतूबमिनार, ताजमहाल आणि मध्यप्रदेशातील भोजशाळाही आहे. त्यासाठी कितीही वेळ लागला तरी आम्ही लढाई लढत राहू, असेही पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *