Menu Close

‘इन्क्विझिशन’चा इतिहास जगासमोर आणला पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोवा फाइल्स : ‘इन्क्विझिशन’चे अत्याचार ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

श्री. रमेश शिंदे

मुंबई – गोव्यासह संपूर्ण कोकण ही भगवान परशुरामांची भूमी आहे, हे ऐतिहासिक आणि पौराणिक सत्य आहे. ही भूमी ख्रिस्ती पंथ उदयापूर्वीची आहे. तरीसुद्धा ‘गोवा ही ‘वास्को द गामा’ आणि ‘झेवियर’ची भूमी आहे’, असे सांगून त्यांचा उदोउदो केला जातो. याच झेवियरने गोव्यात ‘इन्क्विझिशन’ (धर्मसमीक्षण सभा) लागू केले. त्या काळात येथील ‘हात कातरो’ खांब एकमात्र महत्त्वाचा पुरावा शेष राहिला आहे. याच खांबाला बांधून त्या काळी हिंदूंचे हात कापले गेले. तो खांब जुने गोवे येथे सध्या पूर्णतः दुर्लक्षित स्थितीत आहे. हा इतिहास सरकार आणि पुरातत्व विभाग यांच्या माध्यमातून पुसण्याचे षडयंत्र चालू आहे. स्पेन, रशिया यांसह अनेक देशांत ‘इन्क्विझिशन’च्या काळातील पुरावे आणि अवशेष यांचे जतन करून संपूर्ण जगाला पहाण्यासाठी संग्रहालयात ठेवले आहे; पण गोव्यात मात्र ‘हात कातरो’ खांबचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोर्तुगिजांनी केलेल्या अत्याचाराचा इतिहास लपवला जात आहे; मात्र हिंदु समाज आता जागृत होत असून गोव्यात झालेले ‘इन्क्विझिशन’ आणि ‘हात कातरो’ खांब यांद्वारे हिंदु समाजावर केलेला अत्याचार समोर आणल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘गोवा फाइल्स – इन्क्विझिशनचे अत्याचार?’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

या वेळी ‘इन्क्विझिशन’चे स्वरूप दर्शवणारा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. यामध्ये जगभरात कशा प्रकारे ‘इन्क्विझिशन’ केले गेले, हे सचित्र आणि ऐतिहासिक संदर्भासह ‘राष्ट्रीय ऐतिहासिक अनुसंधान आणि तुलनात्मक अध्ययन केंद्रा’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री यांनी मांडले. तसेच ‘इन्क्विझिशन’च्या संदर्भात ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम ऑफ इंडियन हिस्ट्री, पुणे’ यांनी बनवलेले आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले चित्रमय फलक प्रदर्शनही दाखवण्यात आले.

हिंदूंवरील अत्याचार ‘गोवा फाइल्स’द्वारे लोकांसमोर आणून राष्ट्रवाद जागृत करणार ! – जयेश थळी, सचिव, गोमंतक मंदिर महासंघ

श्री. जयेश थळी

गोव्यामध्ये ‘इन्क्विझिशन’ लागू करण्यासाठी उत्तरदायी असलेला, ज्याच्या पुढाकाराने गोव्यामधील हिंदूंवर अत्याचार करण्यात आले, त्या फ्रान्सिस झेवियरला ‘संत’ म्हणून दर्जा दिला जात आहे. हिंदूंवर केलेले अत्याचार लपवण्यात आले, ते ‘गोवा फाइल्स’द्वारे जगभरातील लोकांसमोर आणून राष्ट्रवाद जागृत करणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.

गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी क्षमा मागितली पाहिजे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

गोव्यातील ‘व्होट बँक’ (मतपेढी) जपण्यासाठी येथे सेंट झेवियरचे उदात्तीकरण करण्यात आले. पोर्तुगिजांविषयी येथे सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले गेले. पोर्तुगिजांचा अमानवीय अत्याचार करणारा इतिहास येथील शालेय पाठ्यपुस्तकांत शिकवलाच जात नाही. जगभरातील ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी त्या त्या देशांत जाऊन क्षमा मागितली; मात्र गोव्यातील ‘इन्क्विझिशन’विषयी गोमंतकियांची क्षमा अद्याप मागितलेली नाही. पोप यांनी गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी गोव्यासह सर्वत्रच्या हिंदु नागरिकांनी केली पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *