Menu Close

श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर धर्मशास्त्रविसंगत रासायनिक लेपन नको ! – हिंदु जनजागृती समिती

 

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीची होत असलेली झीज थांबवण्यासाठी पुन्हा एकदा वज्रलेपाच्या नावे रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. मंदिर आणि त्यातील सर्व विधी हे धर्माशी संबंधित असल्याने तेथील प्रत्येक विधी हा धर्मशास्त्र सुसंगत होणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार मूर्तीची झीज होत असल्यास त्यावर काय करावे ? हेही धर्मशास्त्रानुसारच निश्‍चित करायला हवे. धर्मशास्त्रविसंगत रासायनिक लेपन यापूर्वी अनेक वेळा करूनही श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीची झीज थांबलेली नाही. तरी पुन्हा हीच प्रक्रिया करून काय साध्य होणार आहे ?

 

 

त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार आणि धार्मिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊनच धार्मिक पद्धतीने उपाय योजावेत अन् मूर्तीवर रासायनिक लेपन करू नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

श्री. सुनील घनवट

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. यापूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर केलेला वज्रलेप कुचकामी ठरला. अवघ्या वर्षभरातच मूर्तीवरील वज्रलेप निघू लागला, पांढरे डाग पडले, मूर्तीची झीज चालूच आहे, तसेच या प्रक्रियेत मूर्तीच्या मस्तकावरील नागाची प्रतिकृती दिसेनाशी झाली आहे. अशा प्रकारे श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीच्या संदर्भात होणार नाही, याची शाश्‍वती कोण देणार ? यामुळे पूर्वानुभवानुसार या वज्रलेपाचे दायित्व नेमके कुणाचे असेल ? आणि त्यात काही अनुचित घडल्यास कोण उत्तरदायी असणार ? हे विठ्ठलभक्तांना आधीच स्पष्ट करावे.

२. रासायनिक लेपन प्रकियेत विविध रासायनिक द्रव्यांचा वापर केल्याने मूर्तीच्या सात्त्विकतेत घट होते. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रातील मूलभूत सिद्धांत आहे. श्री रुक्मिणीमातेच्या रूपातूनही ही शक्ती प्रक्षेपित होत असते. या प्रक्रियेत मूर्तीवर रासायनिक द्रव्यांचे लेपन करण्यात येते. परिणामी मूर्तीच्या मूळ रूपात पालट होतात. मूर्तीच्या रूपात पालट झाल्यास मूर्तीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचे प्रमाण घटते. परिणामी भाविक मूर्तीच्या आध्यात्मिक लाभापासून वंचित रहातील. भाविकांना देवतेच्या तत्त्वापासून वंचित ठेवणे, ही घोडचूक नव्हे, ते मोठे पाप ठरेल.

३. मूर्ती ही केवळ दगडाची वस्तू नसून त्यात देवत्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा असते. तिच्यावर लेपन करायला ती काही निर्जीव वस्तू नाही. विविध क्षेत्रांतील अडचणींवर त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते. मंदिर हा हिंदु धर्माशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मूर्तीची झीज आणि त्यांवरील उपायांच्या संदर्भात हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती, म्हणजे संत, धर्माचार्य, शंकराचार्य आदींचे मार्गदर्शन घेऊन कृती करायला हव्यात. त्यामुळे पुरातत्व खाते नव्हे, तर धर्मशास्त्र काय सांगते ? हे पहाणे आवश्यक आहे.

४. ओडिशा येथील जगन्नाथपुरी मंदिरातील श्री जगन्नाथ, श्री बलभद्र, श्री देवी सुभद्रा आणि श्री सुदर्शन या देवतांच्या काष्ठमूर्ती प्रत्येक १२ वर्षांनी पालटून नव्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केली जाते. इतकेच काय गणेशोत्सव काळातही श्री गणेशमूर्ती भंग पावल्यास अथवा दुखावली गेल्यास, ती मूर्ती विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना केली जाते आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. याचा विचार करणे धर्मशास्त्रदृष्ट्या योग्य ठरेल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *